राज्यात भाजपा, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं सरकार आहे. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट व अजित पवार गटात संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. मात्र, त्यात रायगडचा समावेश नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी रायगड पालकमंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (४ ऑक्टोबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. राहिला काही ठिकाणच्या पालकमंत्रीपदाचा वाद, तर प्रत्येक पक्षातील आमदाराला किंवा नेत्याला आपल्या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व असावं हे वाटणं साहजिक आहे. म्हणून याचा तिढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सोडवतील. यात मोठा वाद होण्याचं कारण राहणार नाही.”
“तिन्ही नेते निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन योग्य निर्णय घेतील”
“एखाद्या जिल्ह्याचा वाद असू शकतो. रायगड, पुणे, नाशिक या जिल्ह्यांचा वाद सामंजस्याने सोडवायला हरकत नाही. हे तिन्ही नेते पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन योग्य तो निर्णय घेतील, अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे,” असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे- अजित पवार</p>
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे</p>
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
हेही वाचा : अजित पवार नाराज असल्याने मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर असल्याच्या चर्चा, सुनील तटकरे म्हणाले…
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर असली, तर ज्या रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळाला त्याचा निर्णय या यादीत घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सध्या शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडेच आहे.