Sushma Andhare : बडतर्फ पोलीस अधिकारी आणि अँटेलिया तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशात संजय राऊत यांनी सचिन वाझे हा भाजपाचा प्रवक्ता असल्याचा आरोप केला आहे. तर सचिन वाझेंचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हटलं आहे. सचिन वाझेने, “अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हटलं आहे.” यानंतर आता सचिन वाझेवर टीका होतेच आहे. शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणी आता सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनीही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक या तिघांना रुग्णालयात हजर करताना माध्यमांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. मग ती संधी सचिन वाझेलाच कशी मिळाली? सचिन वाझे इतके दिवस झोपला होता का? त्याला पत्र लिहायचं होतं तर इतका वेळ का लागला? वाझेने देवेंद्र फडणवीसांनाच पत्र का लिहिलं? हे प्रश्न उपस्थित होतात.” असं सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) म्हणाल्या

सचिन वाझेच्या आरोपांचं टायमिंग गंमतशीर

सचिन वाझेच्या आरोपांचं टायमिंग गंमतशीर आहे. ज्या पद्धतीने १५ दिवसांत अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रं कशी तयार होती ते सांगितलं, आता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मै वो हूँ जो हवाँओ रुख बदल देता हूँ, असं वक्तव्य केलं. त्यांना हवेचा रोख सचिन वाझेच्या माध्यमातून बदलायचा होता असा आरोप सुषमा अंधारेंनी केला. तसंच देवेंद्र फडणवीस सचिन वाझेचा बोलविता धनी आहेत अशीही टीका केली.” असं सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) म्हणाल्या.

हे पण वाचा- Sanjay Raut : “महात्मा सचिन वाझे कोण आहे? देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन…”, संजय राऊत यांचा आरोप

“विधानसभा निवडणुकीपूर्वी फेक नरेटिव्हचे केंद्र असणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी केलेला हा अत्यंत बालिश प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांना समोरासमोर येऊन बोलण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते मागे राहून नितेश राणेंसारख्यांना पुढे करतात. त्यांना जेवढी सुपारी दिली जाते, तेवढंच ते वाजवतात”, असेही सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) म्हणाल्या. याचप्रमाणे सचिन वाझेच्या प्रतिक्रियेनंतर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आणि सचिन वाझे भाजपाचा प्रवक्ता आहे असा आरोप केला.

पुण्यातल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. (सुषमा अंधारे) ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

सचिन वाझे कोण आहेत? कुठल्या आश्रमात तपश्चर्या करत आहेत?

सचिन वाझे कोण आहेत? कुठे आहेत वृद्धाश्रमात, साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या आश्रमात तपश्चर्या करत आहेत? भाजपा निवडणुकीत उतरतो आहे. पराभवाच्या भीतीने विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर त्यांनी निवडणूक न लढताच पराभव मान्य केला आहे असं म्हणता येईल. अँटेलिया प्रकरणात बॉम्ब ठेवण्यात आला. निरपराध व्यक्तीचा खून करण्यात आला. महाराष्ट्र आणि देशाला हादरवणाऱ्या प्रकरणातला आरोपी पोलीस खात्यात आहे. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना भाजापाने क्लिन चीट दिली. उरलेले दोन आरोपी सुटले आणि मिंधे गटात आहेत. अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली. त्यानंतर त्यांनी फडणवीसांवर आरोप केले. देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यायला हवं. उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो, हे आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहोत, असं Sanjay Raut म्हणाले.