अहिल्यानगर : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गडाख यांनी यापूर्वी सन २०१७ मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून (एकत्रित) बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी अपक्ष वाटचाल सुरू केली होती. मात्र, विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नेवासे नगरपंचायतीचा नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गडाख समर्थकांची आज, रविवारी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुंवर, ॲड. अण्णासाहेब आंबाडे, अण्णासाहेब पठारे आदी उपस्थित होते.

प्रमुख वक्त्यांनी गडाखांच्या नेतृत्वाखाली नेवासा नगरपंचायतीच्या सर्व जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी मंत्री गडाख म्हणाले, आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येईल. ही लढाई कोणती व्यक्ती वा पक्षविरोधात नसून, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.

सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने शिस्तबद्ध काम करून नगराध्यक्षासह नगरसेवक पदावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत. नव्या जोमाने व विकासाच्या हेतूने क्रांतिकारी शेतकरी पक्ष निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.