सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक अहवालानुसार हे नुकसान लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचा फटका जिल्ह्यातील ५२५ गावांतील १७ हजार १७२ शेतकऱ्यांना बसला आहे. भात, नाचणी तसेच इतर शेतीपिकांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे नेमके स्वरूप आणि आकडेवारी निश्चित करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पंचनाम्याचे काम वेगाने सुरू आहे. हे संयुक्त पंचनामे सहायक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहेत.
श्रीमती नाईकनवरे यांनी बाधित शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यांनी त्वरित संबंधित ग्रामस्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांच्या नुकसानीची नोंद घेऊन पंचनामा पूर्ण करता येईल.
