कराड : पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना धरणाच्या पाणलोटात काल शुक्रवारी रात्री आणि आज दिवसभरात कोसळलेल्या जोरदार पावसाने कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. हे दरवाजे दोन फुटांपर्यंत उघडून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर, कोयना धरणात यावर्षी आतापर्यंत धरण क्षमतेच्या १६० टक्क्यांहून अधिक पाण्याची आवक झाली आहे.
कोयना पाणलोटातील जोरदार पावसाने कोयना धरणातील २,१०० क्युसेक पाण्याची आवक १२,५४५ अशी पाचपट झेपावल्याने काठोकाठ भरलेल्या कोयनेचे सहा वक्री दरवाजे उघडणे स्वाभाविक बनले. धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेकचा विसर्ग सुरू असताना, आज शनिवारी सकाळी १० वाजता कोयनेच्या सहा वक्री दरवाजांपैकी दोन दरवाजे एका फुटाने उघडून कोयना नदीपात्रात ३,२०० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला. तद्नंतर दुपारी १२ वाजता आणखी दोन दरवाजे एका फुटाने उघडून या चार दरवाजांतून ६,४०० क्युसेकने तसेच दुपारी दोन वाजल्यापासून सहाही दरवाजे दोन फुटांपर्यंत उघडून १८,७६४ क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीत अल्पशी वाढ होणार आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटातील कोयनानगरला ४२ एकूण ४,६६० मिमी., नवजाला ४० एकूण ५,८७९ मिमी. तर, महाबळेश्वरला ४३ एकूण ५,५६४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे पश्चिम घाटातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यात बामणोली ६३ मिमी., पाडळोशी ६२मिमी., जांभूरला ६०, कागलला ४६, मेढा, सांडवली येथे ४३ मिमी. तसेच धरणक्षेत्रात वारणा ४६ मिमी., कुंभी १२, दूधगंगानगर ८, धोम- बलकवडी ९, कास तलाव ५४, रांजणी तलाव ४०, ठोसेघर धबधबा ८, उरमोडी ४४, कडवी ३२, मोरणा ४९, तारळी ५०, नागेवाडी २० मिमी. असा जलाशय परिसरातील दमदार ते जोरदार पाऊस आहे.
नवरात्रोत्सवाची निराशा
सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून, ऐनभरात आलेल्या नवरात्रोत्सवात या पावसाने निराशा पसरली आहे. नवरात्रोत्सवातील दांडिया, गरबा उत्साहात सुरू असताना, आता महाप्रसादाच्या पंगती उठणार होत्या. पण, अशातच धो- धो पावसाने विघ्न आणले आहे. त्यात लोकांच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले आहे.
उभ्या पिकांना मोठा फटका
खरिपाच्या उभ्या पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीने ओढे, नाले, तलाव, बंधारे पुन्हा खळखळून वाहिले असून, तुडुंब भरलेल्या जलाशयातून पुन्हा जलविसर्गाची वेळ आली आहे. खरीप हंगामातील उभ्या पिकांत पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. त्यात पिके कुजणे, पिकांचा दर्जा खालावताना, उत्पादनही घटणार असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.