पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांची दिवाळी आनंदाची केली. जिल्ह्यातील २० हजार लाडक्या बहिणींना देवाभाऊंच्या भाऊबीजेची भेट देण्याचे काम सुरू झाले आहे. तर पुढील दोन दिवसांत १९२ कोटींची मदत जिल्ह्यात पोहोचत आहे. पूरग्रस्त भागातील महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक व संसारोपयोगी किट, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊंकडून भाऊबीजेची भेट म्हणून माहेरची साडी आणि कपडे भेट देण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून लाडक्या बहिणींना भाऊबीज देण्यात आली आहे. या वेळी गोरे यांनी पुराने बाधित घरांना भेट देऊन पूरग्रस्त लाडक्या बहिणींसोबत दिवाळी फराळ केला.
सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या तडाख्याने अनेक गावांत पूर आला. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. पूरग्रस्तांना मदत, गावातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यात प्रशासनाने तातडीने पावले उचलली, तर या पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी किट आणि लाडक्या बहिणींना भाऊबीज देण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले. त्यानुसार माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव, वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी किट व भाऊबीज भेट वाटप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिवाळी किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, प्रा. सावंत, दादासाहेब साठे, नगराध्यक्षा मीनल साठे, पृथ्वीराज सावंत, सरपंच ऋतुराज सावंत, सरपंच कुसुम पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी महेश सुळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री गोरे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या पुढे जाऊन मदत जाहीर केली आहे. शासनाकडून घरांसाठी ₹१.२० लाख, तर प्रधानमंत्री घरकुल योजनेतून ₹२.५० लाख देण्याचा प्रयत्न आहे. रस्ते, पूलदुरुस्ती, विद्युत पंपांची पुनर्बांधणी, वीजबिल असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, तसेच जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीसाठी परिपूर्ण किट तयार करण्यात आले असून, त्यात साडी, पँट, शर्टचाही समावेश आहे. आमदार अभिजित पाटील यांनी प्राथमिक मदत दिल्याचे सांगत, जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना नवीन जमीन देण्याची गरज व्यक्त केली; तर रणजितसिंह शिंदे यांनी पुरातला ऊस सरसकट तोडण्याची ग्वाही दिली व विद्युत मोटारीसाठी नुकसानभरपाईची मागणी केली.
काळ्या दिवाळीला उत्तर
राज्यात पूरग्रस्तांचे शेती, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी यंदा काळी दिवाळी असे सांगितले. मात्र, सोलापूरचे पालकमंत्री यांनी कामातून चोख उत्तर दिले. तेही माढ्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे आमदार यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त लाडक्या बहिणींना देवाभाऊंची भाऊबीज आणि किटवाटप केले. त्याही पुढे जाऊन अजून मदत करण्याचा विश्वास देऊन भाजपने चोख उत्तर दिले. तर, लाडक्या बहिणींसोबत त्यांनी दिवाळी फराळही केला.