राज्यातील संकटग्रस्त शेतकरी, तसेच सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, तसेच त्यांची पत्नी आमदार अमिता चव्हाण गुरुवारी रस्त्यावर उतरले. त्यांच्याच नेतृत्वाखाली निघालेल्या धडक मोर्चाने शहर दणाणून सोडले. मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.
केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र या दोन्ही सरकारांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात आलेल्या अपयशाच्या मुद्दय़ावर जनमत संघटित करण्याचा भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सर्व जिल्ह्य़ांमध्ये मोर्चे काढण्याचा कार्यक्रम दिला. गुरुवारी सकाळी शहरात दाखल झाल्यानंतर चव्हाण थेट मोर्चात सहभागी झाले. या निमित्त काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत नांदेडमध्ये विराट मोर्चाची नोंद केली. चव्हाण उद्या (शुक्रवारी) औरंगाबादच्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
मोर्चानिमित्त काँग्रेस लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शहरी-ग्रामीण कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी नवा मोंढा भागातील पटांगणावर जमले होते. मोदी व फडणवीस यांच्या सरकारांविरुद्ध या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. चव्हाण यांच्या आगमनानंतर घोषणांचा जोर वाढला. तेथेच झालेल्या सभेत मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पाची ‘ये सब है बकवास’ अशा शब्दांत चव्हाण यांनी खिल्ली उडविली.
पावसाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामाजिक आरक्षण व इतर मुद्दे घेऊन युती सरकारला सळो की पळो करून सोडण्याची रणनीती आखली. त्याची सुरुवात नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून करण्यात आली. मोर्चापूर्वी नवीन मोंढा भागातील काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर चव्हाण यांनी जमलेल्या शेतकरी, तसेच काँग्रेसच्या विविध आघाडय़ांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. माजी राज्यमंत्री आमदार डी. पी. सावंत, अमिता चव्हाण, अमरनाथ राजूरकर, वसंतराव चव्हाण, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसचे जिल्ह्य़ाचे प्रभारी हरिभाऊ शेळके आदी उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली
भाषणाच्या सुरुवातीलाच चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्य़ात गुरुवारी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. सुगाव बुद्रुक येथील दत्ताराम बामनाजी व पिंपळगाव मिश्री येथील राघोजी पुयड या दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. या दोघांना श्रद्धांजली वाहताना शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी तातडीने कर्जमाफी देण्याची गरज व्यक्त केली.
पुढारी जोमात, शेतकरी कोमात!
वार्ताहर, उस्मानाबाद
दुष्काळी स्थितीमध्ये आíथक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेतकऱ्यांपेक्षा पांढऱ्या शुभ्र कपडय़ात व सुटाबुटात पुढाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मागील ४ वर्षांपासून निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा होत असल्याने त्यांची आíथक स्थिती हलाखीची बनली आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या भरवशावर कर्ज घेतले. परंतु अद्यापि पावसाचा पत्ता नाही. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावर काहीही उपाययोजना अमलात आणल्या जात नाहीत. सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज त्वरित माफ करावे, रोहयोची कामे सुरू करावीत, पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करावी, पीकविमा रकमेचे तातडीने वाटप करावे, सरकारकडून आलेले विविध प्रकारचे अनुदान न देणाऱ्या बँकांवर कारवाई करावी, पाणी अडवा पाणी जिरवा योजनेस विशेष निधी द्यावा, शेतीत जोडधंद्यास ५० टक्के अनुदान द्यावे, शेतीमाल उत्पादन खर्चावर हमी भाव द्यावा, धनगर, मुस्लिम, मराठा व िलगायत समाजाला आरक्षण द्यावे, पूर्वीचा भूमी अधिग्रहण कायदा कायम ठेवावा आदी मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संपर्क कार्यालय येथून आंबेडकर पुतळा, शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार मधुकर चव्हाण, विश्वास िशदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय रणदिवे, समीयोद्दीन मशायक, मधुकर तावडे, डॉ. सुभाष व्हट्टे, डॉ. स्मिता शहापूरकर, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे आदी मोर्चात सहभागी झाले हेते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2015 रोजी प्रकाशित
मोदी-फडणवीस सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार
राज्यातील संकटग्रस्त शेतकरी, तसेच सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, तसेच त्यांची पत्नी आमदार अमिता चव्हाण गुरुवारी रस्त्यावर उतरले.
First published on: 10-07-2015 at 01:10 IST
TOPICSअशोक चव्हाणAshok Chavanउस्मानाबादOsmanabadकाँग्रेसCongressदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra ModiनांदेडNandedसरकारGovernment
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound of congress against the modi fadnavis government