राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. शिवसेनेसह महाविकासआघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच मंगळवारी (७ जून) सर्व आमदारांची बैठकही घेतली. यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना मांजर जसं पिलांना उचलून फिरते, तसं शिवसेना आमदारांना घेऊन फिरत असल्याचा टोला लगावला. यावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते बुधवारी (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुभाष देसाई म्हणाले, “मांजर आपल्या पिलांना उचलून फिरते हे प्रेमाचं देखील लक्षण आहे. आम्ही शिवसेनेच्या आमदारांना घेऊन फिरत नाही. आम्हाला काहीही भीती नाही. मी तर आकडाच सांगितला आहे. चौघांची मतमोजणी होईल तेव्हा आम्ही कितीतरी पुढे गेलेलो असू हे तुम्ही बघाल. भाजपाने वाढीव उमेदवार टाकून अपशकून करण्याचा प्रयत्न केला आहे.”

“२४ वर्षात राज्यात राज्यसभेची कधी निवडणूक झाली नाही”

“या राज्यात राजकीय संस्कृती चांगली असावी खेळीमेळीचं वातावरण असावं यासाठी आमचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटलं आणि त्यांना विनंती केली. २४ वर्षात राज्यात राज्यसभेची कधी निवडणूक झालेली नाही. सगळे बिनविरोध होत आले आहेत. २४ वर्षात पहिल्यांदा मतदान होणार आहे. ही अशी पाळी का यावी? कारण आपल्या पूर्वीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तरतूद, कायदा, नियम केले आहेत,” असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

“भाजपाला गोंधळ उडवून महाराष्ट्राची संस्कृती नासवायची आहे”

“भाजपाला गोंधळ उडवून द्यायचा आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती नासवून टाकायची आहे. त्यामुळे त्यांनी एक अधिकचा उमेदवार उभा केला आहे आणि आमच्या विनंतीला मान दिला नाही. त्यांनी सांगितलं आम्ही लढणारच. लढणार तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणारच,” असंही सुभाष देसाई यांनी नमूद केलं.

“हे संभाजीनगर आहे, येथे संभाजीराजांची आठवण केली पाहिजे”

सुभाष देसाई म्हणाले, “भाजपाने मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी केली आहे. मोर्चे काढणे, आंदोलन करणे, विरोध दर्शवणे ही विरोधी पक्षाची कामं आहेत. आम्ही विरोधी पक्षात असताना आम्हीही अशी कामं केली आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, शिवसेना अशा गोष्टींना कधीच घाबरत नाही.”

औरंगाबादचे संभाजीनगर या संदर्भात बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, “औरंगाबाद शहराचे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर केलेले आहे. आताही संभाजीनगरच आहे. कागदोपत्री काही गोष्टी राहिल्या असून त्याही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होतील. मात्र, आता औरंगाबाद शहराचे नाव हे संभाजीनगरच आहे.

हेही वाचा : “तुम्ही विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली?”; सुभाष देसाई म्हणाले, “उद्धव ठाकरे….”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा विराट होणार आहे. या सभेला हे मैदान पुरणार नसल्याने औरंगाबाद शहरातील विविध मैदानांमध्ये मोठ्या स्क्रीनद्वारे सभेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सभेचे पूर्ण नियोजन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही सभा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल असं सुभाष देसाई म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash desai answer criticism of shivsena by raosaheb danve in aurangabad pbs