राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. शिवसेनेने देखील आपल्या दोन उमेदवारांची निश्चिती केली. यात मंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे तुम्ही विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली? असा प्रश्न सुभाष देसाई यांना औरंगाबादमध्ये विचारण्यात आला. यावर सुभाष देसाई यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते बुधवारी (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

सुभाष देसाई म्हणाले, “मी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसून उमेदवार ठरवतो. हे उमेदवार नेते मंडळी ठरवत असतात आणि मी त्या प्रक्रियेत आहे. उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत मीच असल्याने विधान परिषद निवडणूक न लढवणं हा माझा निर्णय आहे. मी यावेळी विधान परिषद निवडणूक लढणार नाही.”

“कोण निवडून येतो हा विषय माझ्यासाठी गौण”

“शिवसेनेच्या दोन जागा आहेत. या दोन जागांवर शिवसेना दोन उमेदवार देत आहे. कोण निवडून येतो हा विषय माझ्यासाठी गौण आहे. शिवसैनिक निवडून येतो आहे हा मोठा समाधानाचा विषय आहे,” असं सुभाष देसाई यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ सभेमुळे औरंगाबादची महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात”, आमदार जैस्वालांचा आठवणींना उजाळा

“काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह लहान-मोठ्या सर्व पक्षांची चर्चा झाली आहे. यावेळी महाविकासआघाडी सरकारने ठरवलेले सर्व उमेदवार निवडून येतील,” अशी हमीही माध्यमांशी बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते औरंगाबाद शहरातील खडकेश्वर परिसरात आले होते.

“हे संभाजीनगर आहे, येथे संभाजीराजांची आठवण केली पाहिजे”

सुभाष देसाई म्हणाले, “भाजपाने मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी केली आहे. मोर्चे काढणे, आंदोलन करणे, विरोध दर्शवणे ही विरोधी पक्षाची कामं आहेत. आम्ही विरोधी पक्षात असताना आम्हीही अशी कामं केली आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, शिवसेना अशा गोष्टींना कधीच घाबरत नाही.”

औरंगाबादचे संभाजीनगर या संदर्भात बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, “औरंगाबाद शहराचे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर केलेले आहे. आताही संभाजीनगरच आहे. कागदोपत्री काही गोष्टी राहिल्या असून त्याही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होतील. मात्र, आता औरंगाबाद शहराचे नाव हे संभाजीनगरच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा विराट होणार आहे. या सभेला हे मैदान पुरणार नसल्याने औरंगाबाद शहरातील विविध मैदानांमध्ये मोठ्या स्क्रीनद्वारे सभेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सभेचे पूर्ण नियोजन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही सभा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल असं सुभाष देसाई म्हणाले.