Sudhir Mungantiwar on Maharashtra Cabinet : राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेने (ठाकरे) राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच खांदेपालट होणार असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात पक्षाच्या ‘सामना’ या मुखपत्रात यासंदर्भातील बातमी देखील प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

एवढंच नाही तर सरकारला अडचणीत आणणाऱ्या आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, असाही दावा करण्यात आला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या सर्व चर्चांवर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही मुनगंटीवार यांनी खुलासा करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, माझं असं मत आहे की आता सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही. कारण समोर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे अशा वातावरणात ज्या त्या जिल्ह्यात असणाऱ्या मंत्र्यांना किंवा एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम करतील असं मला वाटत नाही”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत भाजपाच्या कोर समितीत चर्चा?

“मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोर समितीत सध्या तरी अशी कोणतीही चर्चा नाही. तसेच अशा प्रकारची कोणतीही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळातील बदलाबाबतचा कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो. तसेच राज्य स्तरावरील नेतृत्वांना या बद्दलची कोणतीही माहिती आधी माहिती होत नाही. मात्र, असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या तेव्हा आपल्यापर्यंत येईल. पण, माझं असं मत आहे की आता सध्या तरी अशा प्रकारचा कोणताही फेरबदल होणार नाही”, असं सुधीर मुनगंटीवार म्हटलं आहे.

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेवर राहुल नार्वेकर म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश मानतो. तरी देखील पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन.” दरम्यान, शिवसेनेने (ठाकरे) दावा केला आहे की नार्वेकरांनाच मंत्रिपद हवं होतं, त्यावर नार्वेकर म्हणाले, “जी पक्षाची इच्छा तीच माझी इच्छा.”

‘पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार’ : नार्वेकर

वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा रंगतेय. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “असं काही नाही. सर्व नेते, मंत्री, आमदार चांगलं काम करत आहेत. अनेक लोक असे आहेत ज्यांना काही नव्या संधी मिळणार असतील. पक्षाला त्यांना संधी द्यायच्या असतील तर तसंही होऊ शकतं. माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास पक्ष देईल ती जबाबदारी मला मान्य असेल, तशीच ती इतरांनाही असेल.”