लाडकी बहीण योजनेवरुन आज सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे. नाशिकमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी अजित पवारांना राखी बांधणार का? या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“निवडणूक पुढे ढकलली तरीही तुम्ही निकाल कसा बदलणार? लाडकी बहीण योजनेशिवाय हे (महायुती सरकार) पास होत नसतील तर यातच अपयश दिसतं. दुसरा मुद्दा असा की पैसे वाटून निवडणूक जिंकता येतात तर लोकसभेत जिंकले असते. महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी आहे आणि इमानदार आहे हे या सरकारला समजत नाही. इथेच गल्लत होते.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती
“लाडकी बहीण योजनेसाठी २०० कोटी रुपये देऊन जाहिरात करत असाल तर त्याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं पाहिजे. तेच पैसे आमच्या आशा वर्कर्सना आणि अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना दिले असते तर त्यांची दिवाळी गोड झाली असती. तसंच सरकार आलं नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल. जो उठतो आहे तो धमकी देतोय. एक तर त्यांचं सरकार येणार नाही आणि ही योजना बंद होणार नाही. कारण आमचं सरकार आल्यानंतर या योजनेत आम्ही आणखी सुधारणा आणणार आहोत. लाडकी बहीण योजना यांनी कधी आणली? लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आणली, लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती.” असाही टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.
हे पण वाचा- Supriya Sule : सुप्रिया सुळेंची राखी पौर्णिमेच्या आधी टीका, “१५०० रुपयांत महिलांची मतं विकत घेण्यासाठी..”
देवेंद्र फडणवीस चुकीचे आरोप करत आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी कुठेही संवाद साधायला तयार आहे. त्यांनी वेळ द्यावी, त्यांनी चुकीचे आरोप केले आहेत. चुकीच्या घटना कुठे होत आहेत त्यांना माहीत नाही. नागपूरमध्ये पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जात असल्याच्या घटना घडत आहेत त्याकडे देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं पाहिजे मग दुसऱ्यांना नावं ठेवावीत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवारांना काळे झेंडे दाखवले हे पाहून वाईट वाटलं
अजित पवारांना काळे झेंडे दाखवले तो त्यांच्या महायुतीतला अंतर्गत प्रश्न आहे. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की प्रत्येकाचा मान सन्मान केला पाहिजे. काळे झेंडे दाखवले गेल्याची घटना पाहून मला आश्चर्य वाटलं पण दुसऱ्याच्या घरात आपण कशाला पडायचं? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवारांना राखी बांधणार का?
अजित पवारांना राखी बांधणार का? हे विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे. रात्री १० ते ११ पर्यंत इथल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रोग्राम ठरवला आहे. आधी लगीन कोंडाण्याचं” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा विषय टाळला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd