सातारा: साताऱ्यातील आयटी पार्कसाठी पुणे -बंगळूर महामार्गावरील लिंबखिंड आणि नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल ४६ हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे. साताऱ्याचे आयटी पार्कसाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले.

सुरुवातीला येथील ११३ एकर शासकीय जागेचे हस्तांतरण जिल्हा प्रशासनाकडून शासकीय औद्योगिक वसाहतीकडे दिले जाणार आहे. याबाबतची शासकीय प्रक्रिया सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून साताऱ्यात आयटी पार्क व्हावे याकरिता पाठपुरावा केला आहे.

शिवेंद्रसिंहराजे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी लिंबखिंड व नागेवाडी या परिसरातील शासकीय जागेच्या संदर्भातील प्रस्ताव सादर करून तिथे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता या सर्व परिसराचे ड्रोन सर्वेक्षण केले. सुमारे दीड तास हे सर्वेक्षण सुरू होते. येथील उपलब्ध जमीन आणि या जमिनीचे गट क्रमांक तसेच जमिनीच्या हद्द निश्चिती तसेच जमिनीकडे जाणारे पर्यायी मार्ग या सर्व बाबींचा ड्रोनच्या माध्यमातून हवाई सर्वे करण्यात आला.

यासंदर्भात माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, साताऱ्यात आयटी पार्क व्हावे, यासाठी ड्रोन सर्वेनंतर या जागेसंदर्भातील अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. आयटी पार्क बरोबरच येथे कन्व्हेन्शन सेंटरचाही प्रस्ताव देण्यात आलेला आहे. या सेंटरचा उपयोग सातारकरांना विविध कार्यक्रमाकरिता होणार आहे. तसेच आयटी पार्क करिता लाईट, पाणी पर्यायी रस्ते तसेच इतर सुविधा देण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. आयटी पार्कची पायाभूत सुविधांसह होणारी उभारणी साताऱ्यात तंत्रस्नेही विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सातारा शहर हे पुणे पासून दीड तासाच्या अंतरावर आहे. पुणे बंगळूर महामार्गालगतची आयटी पार्कची जागा या दृष्टीने लिंब व नागेवाडी येथील जागा ही उपयुक्त असल्याचे मत शिवेंद्रसिंह राजे यांनी नोंदवले.

साताऱ्यातील आयटी पार्कसाठी पुणे -बंगळूर महामार्गावरील लिंबखिंड आणि नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल ४६ हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे. साताऱ्याचे आयटी पार्कसाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले. सुरुवातीला येथील ११३ एकर शासकीय जागेचे हस्तांतरण जिल्हा प्रशासनाकडून शासकीय औद्योगिक वसाहतीकडे दिले जाणार आहे.