पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही पराभव पत्करावा लागला. यानंतर महाविकासआघाडीतील विविध नेत्यांकडून भाजपावर टोलेबाजी सुरू आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कसब्यातील भाजपाच्या पराभवावर भाष्य केलं आहे. तसेच भाजपाचा पराभव का झाला याचं कारण सांगितलं. त्यांनी अकोला जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा अंधारे म्हणाल्या, “पिंपरी चिंचवडची लढत तिहेरी लढत होती. त्यामुळे हा तोटा झाला. ही लढत दुहेरी असती तर नक्कीच ही जागाही आम्ही जिंकली असती. कसब्याच्या निवडणुकीत चारवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले रासने यांच्यासाठी अर्ध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळ या निवडणुकीत उतरवलं होतं. तब्बल चार टर्म भाजपाचा बालेकिल्ला असणारी ही जागा आज भाजपाच्या हातून जाते आहे.”

“खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता”

“मला असं वाटतं की, जोपर्यंत खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता. आज खरी शिवसेना महाविकासआघाडीबरोबर आहे आणि निर्णयही मविआच्या बाजूने आहे. हा कौल एका अर्थांने लोकांच्या मनात भाजपाबद्दलचा रोष दाखवणारा आहे. लोक चिडलेले आहेत आणि जनमताचा कल आता मविआच्या बाजूने वळतं आहे हे स्पष्ट होतं आहे,” असं मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ वक्तव्याला पाठिंबा की विरोध?

संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ वक्तव्याला पाठिंबा की विरोध? असा प्रश्न विचारला असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला एक कळत नाही की, संजय राऊत जेव्हा चोरमंडळ म्हणाले तेव्हा ज्या लोकांना झोंबलं आहे त्यात सर्व भाजपाचे का आहेत? मी ‘चोर के दाढी में तिनका’ असं म्हटलं असेल तर जो चोर आहे तोच आपली दाढी चाचपडेल. ते त्यांची दाढी का तपासत आहेत. हा प्रश्न यांना विचारला पाहिजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare comment on defeat of bjp in kasaba assembly constituency bypoll pune rno news pbs