केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जाहीर केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक जाहीर केली. या दोन्ही राज्यातील निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. याआधी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन्ही राज्याचे निकाल जाहीर झाले. हरियाणामध्ये सर्व ९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला. भाजपाने राज्यात सर्वाधिक ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेस (INC)ने ३७ जागांवर विजय मिळविला. इंडियन नॅशनल लोक दल (INLD) पक्षाला २ आणि अपक्ष उमेदवाराच्या वाट्याला तीन जागा आल्या.
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. राज्यातील ९० विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स (NC) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या पक्षाने सर्वाधिक ४२ जागा जिंकल्या. तर पक्षाबरोबर आघाडीत असलेल्या काँग्रेसला सहा, सीपीएम पक्षाला एक जागा जिंकता आली. कलम ३७० हटवल्यानंतर झालेल्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २९ जागा जिंकता आल्या.
तसेच याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA)ला तिसर्यांदा सत्ता स्थापन केली. ४ जून २०२४ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या.
लोकसभेच्या ५४३ जागांसाठी लोकसभा निवडणूक २०२४ ही एकूण सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली. १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे, तर १ जून रोजी अखेरच्या टप्प्याचे मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.