सावंतवाडी: सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग, तळरे-करुळ-गगनबावडा घाट, १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गुरुवारी (४ सप्टेंबर) सकाळी या घाटात दरड कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सैल झालेले दगड आणि माती हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गुरुवारी सकाळी ८ वाजता करुळ गगनबावडा घाटातील एका विशिष्ट ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे माती आणि दगडांनी भरला होता. त्यामुळे वाहतूक तात्काळ थांबवावी लागली. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने मलबा हटवण्याचं काम सुरू केलं, पण केवळ मलबा हटवणं पुरेसं नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं. या करूळ घाट भागात आधीही दरडी कोसळल्या आहेत आणि काही ठिकाणी उभ्या भेगा (vertical cracks) दिसल्या आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने, सैल झालेले खडक हटवण्यासाठी (Loose Scaling) जवळपास आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी, उपजिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी अधिसूचना जारी केली आहे. या काळात वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भुईबावडा घाटमार्गे खारेपाटण-गगनबावडा आणि फोंडा घाटमार्गे देवगड-निपाणी या पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग विभागाला पर्यायी मार्गांवर दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.