Rajul Patel : विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठं अपयश आलं. त्यानंतर ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. एवढंच नाही तर ठाकरे गट महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी संकेत देखील दिले. मात्र, असं असतानाच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजुल पटेल यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर आज त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ऐन महापालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

राजुल पटेल काय म्हणाल्या?

“मी गेली ४० वर्ष पक्षात काम केलं. या काळात पक्षाने मला न्याय देखील दिला. मात्र, पक्षात असे काही कार्यकर्ते असतात की त्यांना आपल्यापासून अडचणी असतात. मात्र, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज मी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या काळात अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात काम करण्यासाठी मला संधी मिळेल. तसेच वर्सोवा विधानसभेत आम्हाला विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत मिळेल”, असं राजुल पटेल म्हणाल्या.

शिंदे गटात काय जबाबदारी मिळेल?

“मी जेव्हा ठाकरे गटात होते. तेव्हाही मी कोणत्या पदाची अपेक्षा केली नव्हती. मी माझ्या कामाच्या जोरावर त्या पक्षात उपनेता, नगरसेविका होते. आता या पक्षातही माझ्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मला मान्य असेल”, असं राजुल पटेल यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे गटात नाराज होतात का?

माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजुल पटेल यांना तुम्ही ठाकरे गटात नाराज होतात का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “मी गेल्यावेळी अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली होती, तेव्हा मला अपक्ष म्हणून ३२ हजार मते मिळाली होती. त्यामुळे मला यावेळी अपेक्षा होती की, जर मला पक्षाने संधी दिली असती तर मी २५ हजार मतांनी निवडून आले असते. मात्र, पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे हे शक्य झालं नाही”, असं राजुल पटेल या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group leader and former corporator rajul patel join eknath shinde shiv sena gkt