छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (रविवार) महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. या सभेवरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाहीत, अशी विधानं सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहेत. या विधानांना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी “शुभ बोल रे नाऱ्या” अशी म्हणंही वापरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, ठाकरे गटाचे सुभाष देसाई यांनी नुकतंच सभास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘वज्रमूठ’ सभेचं आयोजन कशासाठी केलं आहे, याची कारणं सांगितली. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुभाष देसाई म्हणाले, “या ‘वज्रमूठ’ सभेची गरज काय आहे? तर भारताचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही ‘वज्रमूठ’ सभा आयोजित केली आहे. आताची परिस्थिती जवळजवळ आणीबाणीसारखी झाली आहे. सगळे विरोधी आवाज दाबून टाकले जातायत. वाटेवरचे धोंडे दूर करावेत, अशाप्रकारे सगळ्यांना हटवलं जात आहे. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचे नेते म्हणजे दगड-धोंडे नाहीत, तेही तेवढंच देशभक्त आहेत आणि देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आले आहेत.”

हेही वाचा- “नारायण राणे आणि त्यांच्या दोन पोरांना तोच धंदा…”, उद्धव ठाकरेंवरील टीकेला विनायक राऊतांचं प्रत्युत्तर!

“विरोधकांचा योग्य तो मान राखला पाहिजे. त्यांचा मान राखणं दूरच पण त्यांची हेटाळणी केली जात आहे. सध्या अत्यंत क्रूरपणे आणि निर्घृणपणे ठेचून टाकायची, जी पावलं पडायला लागली आहेत, ती आणीबाणीपेक्षा वेगळी नाहीत. म्हणून ‘वज्रमूठ’ची गरज आहे. ही एकजूट देशभरात झाली तरच हे संकट रोखता येणार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने ही पहिलीच संयुक्त सभा घेतली आहे. यानंतर अनेक सभा होणार आहेत,” अशी प्रतिक्रिया सुभाष देसाईंनी दिली.

हेही वाचा- रोहित पवारांकडून बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराजांच्या वक्तव्यांचा समाचार; म्हणाले, “भोंदूंच्या खांद्यावर बंदूक…”

“वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र आले आहेत. त्यांची एकी फार काळ टिकणार नाही” या सत्ताधारी पक्षाच्या टीकेबद्दल विचारलं असता सुभाष देसाई पुढे म्हणाले, “ते जाऊ द्या. ‘शुभ बोल रे नाऱ्या’, असं म्हटलं जातं. त्यामुळे एकत्र येणं, हे चांगलं काम आहे. ही चांगली सुरुवात आहे. त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. शंका-कुशंका घेण्यामध्ये आता वेळ घालवू नये. जे एकत्र येतील ते पुढे कसे राहतील? काय करतील? याचा फार विचार करायला नाही पाहिजे. ही वेळ एकत्र येण्याची आणि एकत्र राहण्याची आहे. एकी आणि ऐक्य टिकवलं तरच भारत मातेसमोर आणि संविधानासमोर येऊ घातलेलं संकट थांबवता येईल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group leader subhash desai shubh bol re narya chhatrapati sambhajinagar mva vajramooth rally rmm