अलीकडेच रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) आणि मुंबईतील मालवणी परिसरात दोन गटात वाद झाला. जमावाने काही वाहनांना आग लावल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. दोन्ही घटनांना धार्मिक स्वरुप आहे का? असा सवालही पवारांनी विचारला होता. पवारांनी चिंता व्यक्त केल्यानंतर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. शरद पवारांना उद्देशून नारायण राणे म्हणाले, "बोलताना संयम असावा. कुणाचीही मनं दुखतील असं बोलायला नको, असं मला वाटतं. पवारांनी चिंता व्यक्त केली. पण आता सरकार त्यांचं राहिलेलं नाही. त्यांचं सरकार असताना लोकांना जास्त चिंतीत टाकलं होतं. लोक चिंताग्रस्त होती. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाल मग उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते." हेही वाचा- “कुणीतरी आपल्या पत्नीबरोबर वावरतंय याची माहिती फडणवीसांना…”, सुषमा अंधारेंचं गृहमंत्र्यांवर टीकास्र! नारायण राणेंच्या या विधानाला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत म्हणाले, "नारायण राणेंचं आता अस्तित्वच राहिलं नाही. तोंडातून एक शब्दही बाहेर येत नाही. त्यांचं शेवटचं जे काही राहिलं आहे, ते त्यांनी उपभोगावं, मला त्यावर जास्त बोलायचं नाही." हेही वाचा- “बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर…”, ‘त्या’ प्रकरणावरून शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना आव्हान "उद्धव ठाकरे हे केवळ मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री नव्हते" या नारायण राणेंच्या टीकेबद्दल विचारलं असता विनायक राऊत म्हणाले, "नारायण राणेंना आणि त्यांच्या दोन पोरांना आता तोच धंदा राहिला आहे. मातोश्रीच्या नावाने डराव-डराव करायचं आणि भाजपामध्ये स्वत:चं अस्तित्व दाखवायचं, हा त्यांचा धंदा राहिला आहे. सिंधुदुर्गात त्यांचा सुपडासाफ कसा केला? हे तुम्हाला माहीत आहे."