मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य पक्षांतील नेत्यांना बरोबर घेण्याचा सर्वस्वी निर्णय हा राज्यातील भाजप नेत्यांचा होता. केंद्रीय भाजप नेत्यांनी राज्याच्या नेत्यांच्या या निर्णयावर फक्त शिक्कामोर्तब केले होते, असे  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात स्पष्ट केले.

केंद्रातील मोदी सरकारच्या कामांचा धडाका बघून अन्य पक्षांमधील नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. जे बरोबर येतील ते आमचे अशी भाजपची भूमिका आहे. सर्वाना बरोबर घेऊन पुढे जात आहोत. राज्यातही हेच पक्षाचे धोरण आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा अन्य नेत्यांना बरोबर घेण्याचा निर्णय हा प्रदेश पातळीवर झाला होता. फक्त या निर्णयाला केंद्रीय नेतृत्वाने संमती दिली होती, असे गोयल यांनी सांगितले. देशाचा कारभार चालविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या अन्य नेत्यांना राज्यातील बारीकसारीक गोष्टींमध्ये लक्ष घालण्यास तेवढा वेळही नसतो. राज्यातील नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाला मान्यता दिली जाते. या प्रकारेच महाराष्ट्रातील अन्य पक्षांमधील नेत्यांच्या भाजप प्रवेशावर प्रदेश पातळीवर निर्णय झाला होता, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार भाजपने पाडल्याचा आरोप केला जातो. पण हे निष्क्रिय सरकार आपल्या कर्मानेच पडले होते, असा दावाही गोयल यांनी केला. घरात बसून कारभार करणाऱ्या त्या सरकारकडून विकासाला खीळ घालण्यात आली होती. मेट्रोसह विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प रखडले होते.  मंत्रालयाच्या बाहेरच सारे निर्णय घेतले जात होते. मुंबईसारख्या शहरात पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने होणे अपेक्षित असते. पण तेव्हा पायाभूत सुविधांची सारी कामे ठप्प झाली होती. लोकांमध्येही ठाकरे सरकारबद्दल नाराजी होती. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा तेव्हा जाणूनबुजून अपमान केला जात होता. शेवटी हे सरकार कोसळले, असे गोयल यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स

चारशेहून अधिक जागा जिंकणार

लोकसभा निवडणुकीची नुसती घोषणा झाल्यावर भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळणार हे लोकच बोलू लागले आहेत. अजून पंतप्रधान मोदी यांची एकही जाहीर सभा झालेली नाही. लोकांमध्ये भाजप व मोदी यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आणि  आदर आहे. त्यातून ४०० पेक्षा अधिक जागा जिंकून आम्हीच सत्तेत येऊ, असा ठाम विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. उत्तर मुंबईत वातावरण अनुकूल असून, प्रचाराच्या वेळी लोकांचा प्रतिसाद बघून भारावून गेल्याचेही गोयल यांनी सांगितले.

विरोधकांनाही निवडणूक रोख्यांतून पैसे

निवडणूक रोख्यांवरून भाजपवर टीका केली जात असली तरी विरोधी पक्षांना रोख्यांतूनच पैसे मिळाले होते याकडे दुर्लक्ष कसे करणार, असा सवाल गोयल यांनी केला. भाजप वर्षांनुवर्षे विरोधात होता तेव्हा पक्षाला पैसे मिळणे कठीण जायचे. सत्ताधारी पक्षाची नाराजी नको म्हणून मोठे उद्योगपती भाजपला पैसे देण्यास टाळाटाळ करीत असत. हा अनुभव लक्षात घेऊन चांगल्या हेतूनेच निवडणूक रोख्यांचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. ५५ टक्के खासदार, निम्म्या राज्यांमध्ये सत्ता, एकूण आमदारांपैकी निम्मे आमदार असतानाही भाजपला एकूण रोख्यांपैकी निम्मी रक्कम मिळाली नव्हती. उलट विरोधी पक्षांना मिळालेली रक्कम जास्त होती, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले.