सोलापूर : सांगोला-मिरज रस्त्यावर माण नदीच्या पुलाजवळ अचानकपणे आडवा आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटलेली चार चाकी मोटार फलटी होऊन समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. या अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला. तर एसटी बसमधील चालकासह अन्य एक प्रवासी जखमी झाला.

सांगोला-मिरज रस्त्यावर, नाझरे गावाजवळ घडलेल्या या अपघातात मोटारीतील (एमएच १०-डीव्ही ८०९९) राहुल बाबासाहेब जवळे (वय ३०, रा. नाझरे, ता. सांगोला) आणि संदेश लक्ष्मीकांत हेगडे (वय २६, रा. बनपुरी, जि. सांगली) हे दोघे मृत्युमुखी पडले, तर एसटी बसचालक मुकुंद गोरख पुरी (वय ५०, रा. तीर्थ बुद्रूक, ता. तुळजापूर) यांच्यासह पुंजाबाई कारभारी वाघमारे (वय ७०, रा. राजापूर, जि. नाशिक) ही वृध्द प्रवासी महिला जखमी झाली. याबाबत उल्हास बाबासाहेब धायगुडे (रा. बलवडी, जि. सांगली) यांनी सांगोला पोलीस ठाण्यास कळविले. माहितीनुसार या अपघातातील मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता, तर एसटी बसची समोरील काच आणि स्टेअरिंग तुटून पडले होते. इंजिनचेही मोठे नुकसान झाले होते.

मृतांपैकी संदेश हेगडे याचा विवाह येत्या १७ ऑगस्ट रोजी होणार होता. तर सांगोला भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी असलेल्या राहुल जवळे याचा विवाह गेल्या ३ मार्च २०२४ रोजी झाला होता. त्यास एक महिन्याचा एक मुलगा असून पत्नी, आई-वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे.