सावंतवाडी: ​सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे प्रदूषण करणारे प्रकल्प आणता येत नाहीत, आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी उद्योजकांच्या अटी-शर्ती जुळत नाहीत, त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी च्या जागेत आता गोल्फ कोर्स आणि हॉटेल्सचा प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

​आडाळी एमआयडीसी मध्ये प्रदूषणकारी प्रकल्प आणण्यास जिल्ह्याच्या पर्यटन जिल्ह्याच्या दर्जा मुळे परवानगी नाही. अनेक कंपन्यांशी चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु त्यांच्या अटी व शर्ती सरकारी नियमांनुसार नसल्याने प्रकल्प बारगळले, असे त्यांनी सांगितले.

मंत्री सामंत म्हणाले, अडचणींवर मात करण्यासाठी आमदार दीपक केसरकर देखील प्रयत्न करत आहेत.आता आडाळी एमआयडीसीतील जागा गोल्फ कोर्स आणि हॉटेल उभारण्यासाठी देण्याचा विचार उद्योगमंत्रालयाने केला आहे. तसा ठराव देखील घेण्यात आला आहे. गोव्याला येणाऱ्या विदेशी पर्यटकांना या गोल्फ कोर्समुळे सिंधुदुर्गकडे आकर्षित करणे आणि जिल्ह्याचे पर्यटन वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.टीका झाली तरी चालेल, पण जिल्ह्याचे पर्यटन वाढविण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

​गुरुवारी सावंतवाडी येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी ही माहिती दिली, तसेच सिंधुदुर्ग देशातील पहिला पर्यटन जिल्हा असूनही अजूनही पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते छोटे आहेत, यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मोबाईल नेटवर्क मिळत नाही, असे त्यांनी सांगितले.