Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match: यूएईमध्ये सध्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या (१४ सप्टेंबर) साखळी फेरीतील सामना होणार आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, या मागणीसाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली. याचबरोबर, ठाकरे यांनी पाकिस्तानी खेळाडूला भारतात खेळायला आमंत्रित केले म्हणून ऑलिंपिक विजेत्या नीरज चोप्रावर टीका करणाऱ्यांचा ‘अंधभक्त’ म्हणून उल्लेख करत त्यांना फटकारले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील भेटीवरही भाष्य केले आहे.
भारत-पाकिस्तान सामना आणि नीरज चोप्रावर टीका करणाऱ्यांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “उद्या भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना आहे. भालाफेकीत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्राने पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याला भारतात खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. हे आमंत्रण त्याने कधी दिले होते, हे माहिती नाही. पण, तो पाकिस्तानी खेळाडू काही आला नाही. यावरून अंधभक्तांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गाठली होती. त्याला यातून किती मनस्ताप झाला असेल, याची मला कल्पनाही करवत नाही. पण, आता अचानक असे काय झाले? ज्या पाकिस्तानबरोबर आपण युद्ध केले, त्यांच्याशी उद्या क्रिकेट सामना खेळणार आहोत.”
देशभक्तीची थट्टा
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा आहे. हा देशभक्तीचा व्यापार चालला आहे. यांना व्यापारापुढे देशाचीही किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की, तुम्ही हे युद्ध थांबल्याचे जाहीर केले आहे का? जे नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते आणि लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांना हे अंधभक्त पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, त्यांचे आता काय करणार? आणि पाकिस्तानबद्दल आपली नेमकी भूमिका काय आहे?”
जावेद मियाँदाद…
यावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “पहलगाममधील पर्यटकांना धर्म विचारून आणि हिंदू म्हणून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. अशी परिस्थिती असताना, पंतप्रधान आणि भाजपाच्या लेखी हिंदुत्त्वाची काही किंमत आहे की नाही? की त्यांना देश आणि हिंदुत्त्वापेक्षा व्यापार मोठा वाटतो? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. मला आठवते आहे की, जावेद मियाँदाद बाळासाहेबांना भेटायला आला होता. त्यावेळी त्याच्या तोंडावर बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले होते की, हा सगळा फालतूपणा बंद कर. जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही, तोपर्यंत माझ्या देशात क्रिकेट वगैरे होऊ देणार नाही.”