Uddhav Thackeray on Political Alliance with Raj Thackeray : काही दिवसांपूर्वी राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यांवरून राजकारण चांगलंच तापलं होतं. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर विरोध झाला. या निर्णयाविरूद्ध राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी एकत्र मोर्चा काढणार असं जाहीर केलं होतं. पण त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता. यानंतर तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते.

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मंचावरून केलेल्या भाषणाची प्रचंड चर्चा झाली होती. २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरणं बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबरोबर युती करण्यासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. सध्या आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत, निवडणुका आल्यावर राजकारणात एकत्र येण्याबाबत चर्चा करू, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रच राहणार – उद्धव ठाकरे

“२० वर्षांनंतर आम्ही एकत्र एका व्यासपीठावर आलो. ठीक आहे. पहिल्यांदा आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र आलो. ते मी आधीच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय तर ते एकत्र राहण्यासाठीच. मराठीच्या विषयावर आम्ही एकत्रच राहणार आहोत. पुढे मुद्दा येतो तो राजकारणाचा. आता कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी आम्ही चर्चा करू,” असं उद्धव ठाकरे भाऊ राज ठाकरेंबरोबर युती करण्यासंदर्भात म्हणाले.

इतर मुद्द्यांबरोबरच उद्धव ठाकरे यांनी मुंबईचं महत्त्व कमी होत असण्याबद्दल वक्तव्य केलं. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे कोणी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न करेल त्यांचे तुकडे करणार हे जाहीरपणे सांगतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.