महाराष्ट्रासह देशभरात सध्या नवरात्रौत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशात ठिकठिकाणी या नऊ दिवसांत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. या कार्यक्रमांमध्ये गरब्याचं खास आकर्षण असतं. मात्र, सध्या याच गरब्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जावा’, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. या मागणीची सध्या चर्चा चालू असून स्थानिक पातळीवर यासंदर्भात विचार केला जात आहे. यावर ठाकरे गटानं परखड शब्दांत टीका करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काही बाटगे खऱ्या मुसलमानांपेक्षा…”

भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांवर ठाकरे गटानं सामना अग्रलेखातून टीका केली आहे. “काही बाटगे हे खऱ्या मुसलमानांपेक्षा जोरात बांग देतात. भाजपमध्ये शिरलेल्या नकली हिंदुत्ववाद्यांचेही तसेच आहे. कालपर्यंत जे हिंदुत्वास लाथा घालत होते, ते आता भाजपच्या तंबूत शिरून हिंदुत्वाच्या घंटा जोरात बडवू लागले आहेत”, असं म्हणत गरब्यामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याच्या नियोजनावर ठाकरे गटानं हल्लाबोल केला आहे.

“हिंदुत्वात भेसळ झाली की, मेंदूत बिघाड होतो. कुठेही, कसेही मारून मुटकून हिंदुत्व घुसवायचे असे सध्या चालले आहे. ज्यांना गरबा खेळायचा असेल त्यांनी ‘घर वापसी’ करून हिंदू धर्मात प्रवेश करावा अशी अट हिंदू बाटग्यांनी घातली. भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाच्या बाबतीत जो वैचारिक गोंधळ उडाला आहे, त्याचाच हा नमुना आहे”, असा टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे.

“यात कुठे आलंय दुर्गापूजेचं मांगल्य?”

“आजचा गरबा हा ‘मारू मुलुंड’ किंवा ‘मारू घाटकोपर’ असा वाद करणाऱ्यांचा आहे. हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव हे राष्ट्रीय एकात्मतेस महत्त्व देणारे आहेत व ते तसेच असायला हवेत. गरब्याच्या मांडवात आता व्यापारीकरण झाले. तेथे कोट्यवधी रुपयांची उधळण होते, नट-नट्यांचा झगमगाट होतो व ‘मारू घाटकोपर’वाल्यांचे नेते व्यासपीठावर ठाण मांडतात. यात दुर्गापूजेचे मांगल्य कोठे आहे?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

“पंतप्रधान मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”, RSSचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

“फक्त हिंदूंनाच प्रवेश हेच धोरण राबवायचे म्हटले तर सगळ्यात जास्त पंचाईत पंतप्रधान म्हणून मोदींचीच होईल. चारच दिवसांपूर्वी टांझानिया देशाच्या राष्ट्राध्यक्ष सामिआ सुलुआ हसन भारत भेटीवर आल्या. पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. मुसलमान कुठेच नकोत हे भाजपचे हिंदुत्ववादी धोरण असेल तर मोदी इस्लामी राष्ट्रांच्या प्रमुखांचे स्वागत आपल्याकडे करणार नाहीत व मोदीही इस्लामी राष्ट्रांत पाय ठेवणार नाहीत. मग मुसलमान नकोत धोरणाचे काय करावे?” असाही प्रश्न ठाकरे गटानं भाजपाला विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slams bjp only hindu allowed for garba in navratri pm narendra modi pmw