Uddhav Thackeray एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देण्याचे संकेत दिले होते. ज्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही तातडीने प्रतिसाद देत टाळीला हाळी देण्याची भाषा केली होती. त्यानंतर दोन्ही नेते विदेश दौऱ्यावर गेले. त्या कालावधीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीच्या काहीशा थंडावल्या होत्या. आता पुन्हा या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान सुषमा अंधारेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांना युतीबाबत विचारलं असता ते काय म्हणाले हे सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंचं वक्तव्य काय होतं?
१९ एप्रिलच्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.” असं राज ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद काय?
राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. “आमच्यात भांडण नव्हतंच, पण तरीही आमच्यातील भांडणं मिटवून टाकल्याचं मी जाहीर करतो. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर यायचं. मग काय द्यायचाय त्या तो पाठिंबा बिनशर्त द्या. महाराष्ट्राचं हित ही एकच माझी अट आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर विविध वक्तव्य समोर आली. आता सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंसह युतीबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते सांगितलं आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
दोघं भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे मोबाइल नंबर आहेत. त्यांना कुठल्याही तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही. जेव्हा कधी वाटेल ते मोबाइलवरुन बोलतील आणि एकत्र येतील. तरीही मनसेच्या लोकांकडून जी काही वक्तव्यं केली जात आहेत ती अपेक्षित नाहीत. तरीही मी आज म्हटलं उद्धव ठाकरेंना हे सांगितलं की सर चर्चा सुरु आहेत. त्यावर मला उद्धव ठाकरे असं म्हणाले की आपल्याकडून काहीच प्रश्न नाही. आता निर्णय त्यांना (राज ठाकरे) घ्यायचा आहे. Now Ball in is there Court. आता त्यांच्या कोर्टात चेंडू आहे आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आता यासंदर्भातला निर्णय मनसे अध्यक्षांनी घ्यायचा आहे.