मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दिलजमाई झाल्याचं संपूर्ण राज्याने ५ जुलैला पाहिलं. दोघांनीही एकत्र येत ‘जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं’ आणि अनाजी पंतांनी आमच्यातला आंतरपाट दूर केला अशी विधानं केली. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या तीन महिन्यांत सहा भेटी पार पडल्या. आता ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र पार पडणार आहे. याचं कारण मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे हे उद्घाटक असणार आहेत.

मनसेचं दिवाळीबाबतचं ट्वीट काय?

मनसे अधिकृत या मनसेच्या अधिकृत पेजवर दीपोत्सव १७ ऑक्टोबर २०२५ संध्याकाळी ६.३० वाजता. असं म्हटलं गेलं आहे. तसंच या दीपोत्सवाचे उद्घाटक हे उद्धव ठाकरे असतील असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख असाच उद्धव ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच सगळ्यांनीच उपस्थित रहावे. दीपावलीच्या शुभेच्छा असा उल्लेखही मनसेने कार्डवर केला आहे.

राज ठाकरे मविआसह जाणार?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला मविच्या शिष्टमंडळासह गेले होते. निवडणूक आयुक्तांना जे निवेदन महाविकास आघाडीने दिलं त्यात राज ठाकरेंच्याच भाषेची छाप दिसून आली. आता प्रश्न आहे की राज ठाकरे हे मविआसह जाणार का? राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांच्या आणि परप्रांतीयांच्या विरोधातली जी भूमिका आहे ती काँग्रेसला मान्य होईल का? हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मविआ सहभागाबाबतचा निर्णय अद्याप होणं बाकी आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या तीन महिन्यांत सहा भेटीगाठी

१) ५ जुलै २०२५ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले. दोघांचीही भाषणं झाली. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

२) २७ जुलै २०२५ : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

३) २७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे गणपती दर्शनसाठी राज ठाकरेंच्या घरी सहकुटुंब भेटले. ज्यावेळी ठाकरे कुटुंबाचा स्नेहभोजन कार्यक्रम हा राज ठाकरेंच्या घरी म्हणजेच शिवतीर्थ या ठिकाणी पार पडला.

४) १० सप्टेंबर : उद्धव ठाकरे हे अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्यासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. तिथे आपण मावशीशी चर्चा करायला गेलो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

५) ५ ऑक्टोबर : संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहचले आणि त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेही पोहचले दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

६) १२ ऑक्टोबर : राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवसास्थानी त्यांच्या मातोश्रींसह आणि संपूर्ण कुटुंबासह पोहचले. ठाकरे कुटुंबांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.