Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात नेमकी कोणाचं सरकार येणार? याबाबत दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशातच २१ नोव्हेंबर रोजी अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेच्या विधि विभागाकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यासंदर्भात अदाणींवर गुन्हा देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आरोपानंतर अदाणी समूहाकडून स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळण्यात आले. मात्र, यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. “काल जो बॉम्ब फुटला तोच बॉम्ब चार दिवस आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता आहे. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. मुंबई भाजपाचे सचिव सचिन शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश करत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आता तुमच्यावर अन्याय देखील झाला नाही पाहिजे आणि न्याय देखील मिळाला पाहिजे. मी शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. मात्र, आपण जनतेला काय देऊ शकलो हे फार महत्वाचं असतं. उद्याच्या दिवसाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. काल जो बॉम्ब फुटला तोच बॉम्ब चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता. १९ तारखेला एक बॉम्ब फुटलेला आहेच. नोटांचा बॉम्ब जो काही वसई विरारला फुटला तो देखील लोकांनी पाहिलेला आहे. पण कालचा जो बॉम्ब फुटला त्याने जर संपूर्ण जग हादरलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा कसा होऊ शकतो. मात्र, या घोटाळ्याबाजाचं काय करणार? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि गौतम अदाणींवर टीका केली.

दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी विनोद तावडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत बविआने त्यांच्यावर पैसे वाटप केल्या आरोप केला होता. विरारमधील एका हॉटेलमध्ये चार तास हा राडा सुरु होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावरूनच भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.

गौतम अदाणींवर काय आरोप करण्यात आले?

अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेच्या विधि विभागाकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भात अदाणींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. खुद्द गौतम अदाणी व त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह एकूण सात जणांचा यात समावेश असल्याचा हा आरोप आहे. या सगळ्यांनी मिळून सौर ऊर्जा वितरणाचं कंत्राट मिळवण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार ०१९ कोटी रूपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. अदाणी व अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी हा सगळा प्रकार कर्जदार व गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवला व त्यातून ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज व रोखे गोळा केले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, हे आरोप अदाणी समूहाकडून फेटाळण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray on gautam adani charged with bribery in us fraud and maharashtra vidhansabha election 2024 vinod tawde gkt