Uddhav Thackeray remark on Outgoing from Party : शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत, शिवसेनेची अलीकडच्या काळातील कामगिरी, भविष्यातील धोरणं यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की महाराष्ट्रात सध्या खूप घडामोडी होत आहेत, वेगवेगळे वारे वाहत आहेत. देशात आणि महाराष्ट्रात जे चालू आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मन की बात काय आहे? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्हाला त्या वाऱ्यांमध्ये काही फुगे दिसत असतील. हे फुगे काही वेळ तरंगतील आणि नंतर फुटून जातील.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे वारे वाहतायत, परंतु या वाऱ्यांमध्ये काही हवेचे फुगे देखील आहेत. म्हणजे ते फुगे काही काळ वर जातात, तरंगतात आणि नंतर त्यातील हवा निघून गेली की ते खाली पडतात. असे काही फुगे सध्या तरंगत आहेत ते फुगे म्हणजे काही वारे नाहीत”

शिवसेनेतील (उबाठा) आऊटगोइंगवर उपाय काय?

यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं की आपल्या शिवसेनेतून (उबाठा) जे आऊटगोइंग चालू आहे, त्यावर उपाय काय? यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काही वेळा साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण त्याला बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा दुसरा चांगला माणूस घेतो तेव्हा बरं वाटतं की, चला एक ‘बला’ टळली! आता आमच्यातून जे लोक तिकडे गेले आहेत, ते तिकडे काय दिवे लावत आहेत ते तुम्ही बघत आहातच. त्यामुळे असे दिवटे गेलेलेच बरे.”

तर निवडणूक आयोगाला मी धोंड्या म्हणणार

“मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोकांनी कितीही चोराचोरी केली तरी शिवसेना (उबाठा) थांबणार नाही. निवडणूक आयोग शिवसेनेचे निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकेल किंवा गोठवू शकेल. खरं तर असा वाद असेल तर नियमाप्रमाणे ते गोठवायला पाहिजे. मात्र,शिवसेना हे नाव ते इतर कोणाला देऊ शकत नाहीत. निवडणूक आयोगाला तसा अधिकार नाही. कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी व माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून धोंड्या ठेवलं तर मला तो अधिकार आहे का? परंतु, माझ्या पक्षाचं नाव बदलल्यावर मी त्याला धोंड्याच म्हणणार.

चोर तो चोरच : उद्धव ठाकरे

“त्या धोंड्याने काही केलं तरी लोक धोंड्याचं ऐकणार नाही. कारण तो चोरीचा माल आहे. तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावर मर्दुमकी गाजवत असाल तरी चोर तो चोरच राहणार आहे.”