Uddhav Thackeray भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच मोठं फेक नरेटिव्ह आहे. नितीश कुमारांसह केंद्रात युती केली आहे. हे नितीश कुमार संघमुक्त भारत झाला पाहिजे असं म्हणाले होते. चंद्राबाबू नायडू यांच्यासह भाजपाने हात मिळवणी केली आहे. चंद्राबाबू मोदींना अतिरेकी म्हणाले होते आणि मोदी चंद्राबाबूंना यू टर्न बाबू म्हणाले होते. पण आता सत्तेत एकत्र बसलेत. मला एक अशी गोष्ट सांगा जी त्यांनी केली आहे आणि मी केली आहे. मग कुठल्या तोंडाने माझ्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करत आहात? तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीच. आम्ही भाजपाला सोडलं आहे हिंदुत्व सोडलेलं नाही. नाशिकमध्ये निर्धार शिबीराला उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

भ्रम निर्माण करायचं काम भाजपाचं-उद्धव ठाकरे

भ्रम निर्माण करायचा एकमेकांमध्ये दगड मारायला लावायचे, मग बटेंगे तो कटेंगे, तिकडे बाटेंगे तो जितेंगे यांचं चाललंय काय? शेतात बैल जातो लघुशंका करताना कसा जातो वाकडातिकडा तसं जाऊ नका. सरळ जा मग आम्हाला कळेल की तुम्ही खरे हिंदुत्ववादी आहात. पण एकदा धरायचं, एकदा मारायचं मग सौगात द्यायची, एकदा अमुक करायचं, एकदा तमुक करायचं म्हणजे नेमकी यांची भूमिका काय? आजवर आम्ही कधी जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन आलो नाही. आमच्यापैकी कुणीही जाऊन जिनाच्या थडग्यावर डोकं टेकून आलं नाही.

माझा मोहन भागवतांना सवाल आहे की सौगात वाटली त्यातले देशप्रेमी मुस्लिम कसे ओळखले?-उद्धव ठाकरे

या देशातले मुस्लिम, देशप्रेमी मुस्लिम, मोहन भागवतही म्हणाले मुस्लिमही शाखेत येऊ शकतात पण ते देशप्रेमी असले पाहिजेत. आता माझा मोहन भागवत यांना सवाल आहे ३२ लाख कुटुंबाना जी सौगात वाटली त्यात ओळखलं कसं त्यांच्यापैकी कोण देशप्रेमी कोण देशद्रोही आहे? आपल्याकडे गोवंश हत्याबंदी आहे. माझा त्याला विरोध नाही. किरण रिजेजू बोलले होते की ते गोमांस खातात ते तुमचे मंत्री. ज्यांचा संशय येतो त्यांना पाठलाग करुन मारलं गेलं. नेमका तुमच्या हिंदुत्वाला शेंडा बुडखा, आकार, उकार आहे की नाही? या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता आपल्यावर म्हणजे महाराष्ट्रावर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आला हे आपण इतिहासात वाचलं आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपण मोठे केलेले गद्दार उरफाटे निघाले-उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी पराभव मानायला तयार नाही. आज जर बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तर यांच्यापेक्षा जास्त संख्येने आपली मायबाप जनता आपल्याला निवडून देईल हा माझा विश्वास आहे. आपण मोठे केलेले गद्दार उफराटे निघाले तरीही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि माझे बांधव असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही. छत्रपतींचा महाराष्ट्र यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.