राजापूर : कोकणासाठी काहीही न केलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येथे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी जोरदार टीका केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांमध्ये झालेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे सध्या महासंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत शहरातील राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या जाहीर सभेमध्ये राणे बोलत होते. ते म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने कोकण विकासासाठी विविध मार्गानी निधी दिला आहे. मात्र, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत राज्यासह कोकणासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने काय दिले? केंद्रातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या काळात जो विकास झाला नाही तो विकास पंतप्रधान मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्वबळातील बळ गेले असून तो पक्ष आता संपला आहे. त्याचा जास्त विचार करू नका. त्यांच्यासोबत असलेले खासदार आणि आमदारही आगामी निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणार नाहीत. लोकांना आता भाजपची गरज असून समाजातील सर्व घटकांसह तळागाळामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पोहोचवण्याचे आणि आगामी निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा विजयी झेंडा फडकविण्यासाठी आतापासून कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

या वेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशीष शेलार, अभियान राज्य प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन, राजन तेली, बाळ माने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.