Uddhav Thacker Met flood-affected farmers in Beed : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्याची राज्यभर चर्चा होत आहे, तसेच त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. “आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही जनतेला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं”, असं अजित पवार म्हणाले. तसेच ते शेतकऱ्यांना म्हणाले, “सारखी कर्जमाफी मागण्यापेक्षा तुम्हीसुद्धा हातपाय हलवले पाहिजेत.” यावरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अजित पवारांना म्हणाले, “तुम्ही सरकार हलवताय का?
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पूरग्रस्त गावांना भेटी देत आहेत. आज (५ नोव्हेंबर) त्यांनी बीडमधील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अजित पवार बेधडकपणे सांगत आहेत की आम्हाला निवडणुकीत जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आमच्यासमोरही अडचणी आहेत. त्यामुळे तुम्ही जरा हातपाय हलवा. अहो, अजित पवार तुम्ही कोणाला हातपाय हलवायला सांगताय?”
उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला
उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगताय. हातपाय हलवूनही त्यांच्यावर संकट ओढवलं आहे. आपत्तीच इतकी मोठी आली आहे की हलवले जाणारे हात आता तो कपाळावर मारायची वेळ आली आहे. त्या शेतकऱ्याला तुम्ही हातपाय हलवायला सांगताय. मग तुम्ही काय करताय? तुम्ही सरकार हलवताय ना? मी काही वेडंवाकडं बोलत नाही. मी असंच म्हटलं, अजित पवारांना विचारलं की तुम्ही सरकार हलवताय ना?”
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार म्हणाले होते की “शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर तुम्ही वेळच्या वेळी कर्ज फेडण्याची सवय लावा ना… सारखंच फुकटात आणि सारखंच माफ करा म्हटल्यावर कसं व्हायचं? असं चालत नाही. एकदा साहेबांनी (शरद पवार) कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्रजींनी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) दिली तसेच मी उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी दिली. आता पुन्हा आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही माफ करू, आम्ही कर्ज माफ करू. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही परिणाम झाला आहे. लोक पैसे भरायलाच तयार नाहीत.”
“आम्ही तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे जिल्हा बँक, डीपीडीसी, जिल्हा परिषद आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मदत करू. पण सारखीच मदत मिळणार नाही. तुम्ही पण हातपाय हालवले पाहिजेत”, असं अजित पवार म्हणाले होते.
