मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या (शिंदे गट) १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. तसेच, ३१ डिसेंबरच्या आत यासंबंधीची कार्यवाही करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेले बंडखोर आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे.

विरोधी पक्षांकडून केल्या जात असलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (२७ ऑक्टोबर) उत्तर दिलं. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील. शिंदे अपात्र ठरले तर आम्ही त्यांना विधान परिषदेवर निवडून आणू आणि तेच पुढे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना गद्दारांची बाजू घेण्यासाठी वेळ आहे. परंतु, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी वेळ नाही. जे लोक त्यांच्या न्यायासाठी, हक्कांसाठी आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत, आत्महत्या करत आहेत, त्यांच्यासाठी फडणवासांकडे वेळ नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. महाराष्ट्रातलं आंदोलन चिघळलं असताना फडणवीस मात्र भाजपाच्या प्रचारासाठी रायपूरला (छत्तीसगड) जातात. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची?