महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मनातली खंत मांडली. तसंच आपण पक्ष का सोडला ते सगळं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. तसंच मी परतीचे दोर कापून टाकले आहेत. त्यामुळे मी मनसेत परतण्याचा काही प्रश्न येणार नाही. माझी भूमिका मी दोन ते तीन दिवसांत मांडेन असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. कुणीही पक्षसंघटना सोडू नका असंही आवाहन यावेळी वसंत मोरेंनी केलंं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले वसंत मोरे?

“मी मागची २५ वर्षे सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंसह काम केलं. पुणे शहरांतला मी पहिला कार्यकर्ता त्यावेळी होतो. आजपर्यंत राज ठाकरेंसह होतो. मात्र आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य पदाचा आणि इतर सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मागच्या दीड वर्षापासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र माझ्याविरोधात कारवाया वाढल्या. इच्छुकांची यादी पक्षातली वाढली. ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल केला त्यात पुणे शहर मनसेची स्थिती नाजूक आहे अशा गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या. नकारात्मक अहवाल माझ्याविरोधात पाठवण्यात आला. तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असं त्यातून सांगण्यात आलं.”

माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला

मी एकनिष्ठ राहिलो पण माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. मी ज्यांच्यासह १५ वर्षे घालवली तेच लोक वसंत मोरेला तिकिट मिळू नये म्हणून अहवाल पाठवत असतील तर काम कसं करणार? त्यामुळे मी सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मी परतीचे दोर कापले आहेत. मी सामान्य कार्यकर्त्यांशी बोललो, पण नेत्यांचा फोन घेतला नाही. हे बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले. मी अशा लोकांमध्ये कसा काय राहणार?

माझ्या विरोधात कारवाया झाल्या

माझ्याविरोधात कारवाया करणाऱ्या साथीदारांबरोबर कसा काय राहू? त्यामुळे मी राज ठाकरेंकडे वेळ मागितली होती. मात्र मला त्यांच्याकडून काही निरोप आला नाही. पुण्यातल्या मनसेत असं राजकारण होणार असेल तर पुण्यात मनसेमध्ये कसा राहणार? चुकीच्या लोकांच्या हातात शहर दिलं आहे. इथला महाराष्ट्र सैनिक कुठल्या परिस्थितीतून जातो आहे ते लोकांना माहीत आहे असंही वसंत मोरे म्हणाले. मी राजीनामा दिल्यानंतर मला सगळे विचारत आहेत, पण कालच्या पोस्टचीही दखल कुणीही घेतली नाही. पक्ष वाढवण्यासाठी निवडणूक लढली गेली पाहिजे. काही लोक निवडणूक लढवायलाच नको असा अहवाल का देत आहेत? २०१२ ते २०१७ या काळात आपण सेकंड लार्जेस्ट पार्टी होतो. या शहरात मनसेची ताकद आहे. मी वारंवार सांगत होतो, तसंच वसंत मोरे खासदार होऊ शकतो हे सांगत होतो. मात्र काही लोकांना हे वाटत नाही. पक्षाच्या कोअर कमिटीने हा आरोप माझ्यावर केला आहे. मी कुठवर गोष्टी सहन करायच्या आणि गाऱ्हाणी मांडत राहायची? असं वसंत मोरे म्हणाले.

हे पण वाचा- “वसंत मोरेंनी वॉशिंग मशीनच्या दिशेने…”, मनसेला सोडचिठ्ठी देताच संजय राऊतांचे मोठं विधान

..तर एकटा लढणार

मी कुठल्याही पदावर नाही, मी सदस्यत्वपदाचा, सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. मी कुठल्याही पक्षात अद्याप गेलो नाही. पुणेकरांना विचारुन मी माझी भूमिका ठरवणार. ते म्हणाले मी एकटं लढायचं आहे तर मी एकटा लढणार असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. मी कुणाच्याही कुबड्या घेऊन पुढे आलो नाही. राज ठाकरेंच्या मनात मी माझं स्थान निर्माण केलं होतं. त्याला धक्का लावण्याचं काम कोअर कमिटीने केलं आहे. पक्षाला संपवणाऱ्या लोकांसह मला काम करायचं नाही त्यामुळे मी मनसे पक्ष सोडला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant more first reaction after his resignation what did he say scj