परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने या वर्षी विविध वाणांची ४०० क्विंटल बियाणे विक्री झाली आहे. दरवर्षी खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बियाणे विक्री झाली. शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीनचे बियाणे वापरावे, विकत घेऊ नये असे सातत्याने सांगणाऱ्या विद्यापीठाचे सोयाबीनचे ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले.
विद्यापीठाच्या बीज प्रक्रिया केंद्रावर खरीप हंगामासाठी बियाणे विक्रीचा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट आदींच्या उपस्थितीत झाला. बियाणे विक्रीमध्ये प्रामुख्याने खरीप ज्वारी जैव संपृक्त वाण (परभणी शक्ती), मूग (बीएम २००३- २), तुरीच्या लाल वाणामध्ये (बीडीएन ७१६, बीएसएमआर-७३६), तुरीच्या पांढऱ्या वाणांमध्ये (बीडीएन ७११, बीएसएमआर ८५३, व गोदावरी), सोयाबीन (एमएयूएस १६२,एमएयूएस १५८ व एमएयूएस ६१२), भरड धान्य राळा व नाचणी, कापूस सरळ वाण (एन एच १९०१ बीटी, एन एच १९०२ बीटी), कापूस देशी वाण (पीए ८१०) या वाणाच्या बियाण्याची विक्री करण्यात आली. कृषी विद्यापीठाच्या वतीने बीटी कपाशीचे सरळ वाण यंदा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
दरवर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बीटी बियाणे नव्याने खरेदी करावी लागते. मात्र, या सरळवाणामुळे किमान दोन ते तीन वर्ष शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता भासत नाही. सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पादित कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे.
विद्यापीठ संशोधन वाणांच्या बियाणे खरेदीसाठी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी हजेरी लावली. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. विक्री झालेल्या बियाण्यामध्ये सोयाबीन- ३०० क्विंटल, तूर ९० क्विंटल, मूग १० क्विंटल, ज्वारी एक क्विटल व कापूस दीड क्विंटल अशा एकूण ४०० क्विंटल बियाणाची विक्री करण्यात आली. विद्यापीठाच्या परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रावर कार्यालयीन वेळेत बियाणे विक्री सुरू आहे. विद्यापीठाअंतर्गत कापूस संशोधन केंद्र नांदेड, कृषी विज्ञान केंद्र छ. संभाजीनगर, कृषी विज्ञान केंद्र खामगाव, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर, गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर, कृषी महाविद्यालय गोळेगाव व कृषी महाविद्यालय आंबेजोगाई आदी ठिकाणी लवकरच बियाणे विक्रीस उपलब्ध होईल, असे सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे यांनी कळविले आहे.
सरळ वाण ‘बीटी’ मध्ये परावर्तित पहिले कृषी विद्यापीठ
कापसाच्या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्यामुळे शेतकऱ्यांचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार असून यंदापासून महाराष्ट्राबाहेरही गुजरात व मध्यप्रदेश या राज्यात या वाणाच्या लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. सरळ वाण बीटीमध्ये परावर्तीत करणारे परभणी कृषी विद्यापीठ राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे.