Cash For Votes in Maharashtra Assembly Election 2024 : विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजपा आणि बविआ कार्यकर्ते आपापसांत भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली. परंतु, जवळपास २ ते ३ तास राडा झाल्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एका गाडीतून रवाना झाले. यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रियाही दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सिल केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : ‘सोडून दिलं…”, विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर हितेंद्र ठाकूर बॅकफूटवर?

क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर अन् विनोद तावडे एकत्रच रवाना

दरम्यान, या प्रकरणचा खुलासा करण्याकरता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदही सुरू केली. परंतु, निवडणूक आयोगाने ही परिषद रद्द करण्याचे आदेश दिले. यावरूनही हितेंद्र ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. तेथील परिस्थिती निवळल्यानंतर क्षितिज ठाकूर यांनी कार्यकर्तांना हॉटेलच्या बाहेर काढले. विनोद तावडे एकटेच गाडीत बसले. परंतु, पुन्हा गाडीतून बाहेर आले आणि हितेंद्र ठाकूरांच्या चारचाकीमध्ये जाऊन बसले. या चारचाकीत क्षितिज ठाकूर चालकाच्या जागेवर बसले होते, तर त्यांच्या बाजूला हितेंद्र ठाकूर आणि मागच्या सीटवर विनोद तावडे बसले होते. त्यांच्या या सवारीबद्दल माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी माध्यमांना सविस्तर उत्तले दिली नाहीत.

हितेंद्र ठाकूर म्हणाले, “आम्ही जेवायला जातोय. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलतो.. उरलेले पैसे ते मला देतील. आम्ही मित्र आहोत.” दरम्यान, विनोद तावडे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

आता एएनआयशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, “पोलिसांनी मला सांगितलं की तावडेंची गाडी खराब झालीय. त्यांना सुरक्षित बाहेर काढा. ती जबाबदारीही त्यांनी माझ्यावरच टाकली. मी माणुसकी म्हणून तेही केलं. काही चुकीचं झालं तर ते चांगलं नाही. दुसरी गाडी दिली आणि त्यांना मुंबईत पाठवलं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawade and hitendra thakur went in a car way to mumbai after clashes sgk