राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दिल्लीत जाऊन घेतलेल्या या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. मनसे आता महायुतीत सहभागी होणार, अशा चर्चांना जोर आला होता. परंतु, या भेटीत नेमकं काय ठरलं? हे गुलदस्त्यात होतं. याबाबत राज ठाकरे यांनी आता पाडवा मेळाव्यात जाहीर भाषणात सांगितलं आहे.

“जसे तुम्ही ऐकत होतात, तसं मीही ऐकत होतो. जसं तुम्ही वाचत होतात, तसं मीही वाचत होतो. अमित शाहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाले, त्यात पत्रकारांचा काही दोष नाही. मी तिथे दिल्लीला पोहोचवलं काय, राज ठाकरेंना १२ तास थांबण्याची वेळ आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं. पण भेटच दुसऱ्या दिवसाची होती. त्यामुळे आदल्या दिवशी पोहोचलो”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आपण एकत्र आलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण माझी प्रतिक्रिया होती की काय केलं पाहिजे? असं वर्ष दीडवर्षे एकत होतो. पण मला समजेना. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सांगत होते. परंतु, एकत्र आले पाहिजे म्हणजे काय. मग मी अमित शाहांशी भेटायचा निर्णय घेतला. या भेटीत सगळे विषय निघाले. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवावी, इथपर्यंत प्रकरण आलं. यामुळे बाहेर लगेच चर्चा सुरू झाली की लाव रे तो व्हीडिओचं काय होणार?”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> MNS Gudi Padwa Melava: “मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर..”, राज ठाकरेंनी ‘त्या’ चर्चेवर मांडली भूमिका

“थोडीशी पार्श्वभूमी देतो. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याच घरात शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जे पाहत आलो ते बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. अनेक ठिकाणी गेलो, हिंडलो, फिरलो. त्यामुळे माझ्या आयुष्यातील एकमेव पक्ष होता, शिवसेना. १९८८-८९ च्या आसपास भाजपा शिवसेनेची युती झाली. ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर सर्वधिक संबंध आले असतील तर भाजपाबरोबर आले. गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरींबरोबर आले. यांच्याबरोबर जे संबंध होते, ते राजकारणापलिकडे होते.

हेही वाचा >> “राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत बोलणारा मी पहिला माणूस

“पण माझा संबंध काँग्रेसवाल्यांबरोबर आला नाही. पुल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर, काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या, पण गाठी पडल्या भाजपावाल्यांबरोबर. त्यामुळे अनेक वेळेला अगदी चांगले संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात दौऱ्याला गेलो. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात पाहिला. तेव्हा मी त्यांचा विकास पाहिला. ती सगळी प्रगती, विकास पाहत होतो. महाराष्ट्रात मी आलो, पत्रकारांनी प्रश्न विचारले की गुजरात कसं आहे, तेव्हा म्हणालो गुजरात डेव्हलप होतंय, पण महाराष्ट्र खूप पुढे आहे. आणि मग त्यावेळी त्यांच्याबरोबर संबंध प्रस्थापित होऊ लागले. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा मी पहिला माणूस होतो”, असंही राज ठाकरे म्हणाले.

नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा

राज ठाकरे महायुतीत सहभागी होऊन लोकसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. तसंच, महायुतीत सामिल झाल्यास राज ठाकरेंना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून फक्त नरेंद्र मोदींसाठी शिवसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.