२ जुलै २०२३ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला न विसरता येण्यासारखा दिवस आहे. कारण याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार २ जुलैला झालेल्या या शपथविधीला उपस्थित होते. मात्र नंतर ते शरद पवार गटात आले. आता त्यांनी या सगळ्या संघर्षावर एक सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी कोण? ही चर्चा सुरु झाली आहे.
काय आहे अमोल कोल्हेंचं ट्वीट?
मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा कोण? महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. असं म्हणत अमोल कोल्हेंनी दोन ओळी ट्वीट केल्या आहेत. तसंच त्यांच्या भाषणाचा अंशही त्यांनी ट्वीट केला आहे. त्यात अमोल कोल्हे म्हणतात, “जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा आपण कौरव म्हणतो आणि पांडव म्हणतो. बरोबर? महाभारत कुणामुळे घडलं? कौरवांमुळे की पांडवांमुळे? मी काहीही म्हटलं नाही. लोकांच्या मनात जे काही आहे तेच सांगतो. शकुनीमामामुळे ज्याच्यामुळे महाभारत घडलं. जेव्हा कौरव आणि पांडव होते तेव्हा आधी भावना अशी होती वयम् पंचाधिकम् शतम् म्हणजे समोरुन काही आक्रमण आलं तर त्यावेळी कौरव आणि पांडव हे दोन भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते. पण यांच्यात मिठाचा खडा कुणी टाकला? मिठाचा खडा शकुनीमामाने टाकला.” असं ते म्हणत आहेत. तसंच आम्ही साहेबांबरोबर आहोत असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांचा रोख नेमका कुणाकडे? याची चर्चा आता सुरु झाली आहे.
हे पण वाचा- विठ्ठलास बडव्यांनी घेरले शब्दप्रयोग चुकीचा, महंत सुधीरदास यांचा आक्षेप
५ जुलैला दोन भाषणं
राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडल्यानंतर ५ जुलैला दोन सभा पार पडल्या. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला. एवढंच नाही तर मी त्यांना विठ्ठलाच्या जागी मानतो आता त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशीही भूमिका घेतली. तर शरद पवार यांनीही जोरदार भाषण करत अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं. एवढंच नाही तर शरद पवार यांची नुकतीच येवला या ठिकाणी सभा घेतली. तिथे त्यांनी भुजबळांना उमेदवारी दिल्याबद्दल माफीही मागितली. आता या सगळ्या राजकीय उलथापालथीनंतर काय काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.