सातारा : महाबळेश्वर शहरातील एस. टी. स्थानकसमोर असलेल्या श्रेयस हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आलेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रागिणीकुमारी सिनील साव (वय १९, मूळ रा. मुशीमरी, बिहार) असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, नागपूर येथील प्रथम इन्स्टिट्यूट येथून प्रशिक्षण घेऊन चार परप्रांतीय तरुणी हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आल्या होत्या. यामध्ये रागिनीचा समावेश होता. रागिणी ही आपल्या मैत्रिणींसमवेत हॉटेलच्याच कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या खोलीत राहत होती. तिच्या इतर मैत्रिणी रात्री आपले काम संपवून पुन्हा खोलीच्या दिशेने आल्या. एक तास दरवाजा ठोठावून देखील कोणताही आवाज न आल्याने त्यांना संशय आला. याबाबतची माहिती त्यांनी हॉटेल व्यवस्थापनास दिली. त्यांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला.
यावेळी स्वच्छतागृह आतून बंद होते. दरवाजा उघडून पाहिले असता रागिणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हॉटेल व्यवस्थापनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेबाबत तिच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बिपिन सांडभोर यांनी दिली.