काही दिवसांपासून आमिर खानचा भाऊ फैजल खान चर्चेत आहे. अलीकडेच फैसलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने आमिर खान, तसेच त्याच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. पण, पुन्हा एकदा फैजल त्याच्या विधानामुळे चर्चेत आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबाशी असलेले संबंध संपवण्याबद्दल बोलला आहे आणि त्याने आमिर खानकडून पैसे घेण्यासही नकार दिला आहे.
फैजल खानने चित्रपटसृष्टीत फारसे नाव कमावले नाही; परंतु तो त्याच्या विधानांमुळे लोकांमध्ये चर्चेत राहतो. काही काळापूर्वी त्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आमिर खाननं त्याला जवळजवळ एक वर्ष घरात कोंडून ठेवलं होतं आणि त्याला औषधं दिली गेली. त्याबरोबरच त्यानं इतरही अनेक आरोप केले. आता बॉलीवूड बबलला दिलेल्या निवेदनात फैजलने म्हटले आहे की, त्याने कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
फैजलने आपल्या अधिकृत निवेदनात जाहीर केले आहे की, आता तो त्याचा भाऊ आमिरकडून कोणतीही आर्थिक मदत घेणार नाही किंवा त्याच्याबरोबर कोणत्याही कौटुंबिक नात्यात राहू इच्छित नाही. फैसल खानने जाहीर केले की, त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी मालमत्तेशी संबंधित संबंधही तोडले आहेत. त्याने म्हटले आहे की, तो आता त्याचे दिवंगत वडील ताहिर हुसेन, त्याची आई झीनत ताहिर हुसेन किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संबंधित नाही.
फैजलने पुढे स्पष्ट केले की, तो त्याच्या पालकांपैकी कोणाच्याही मालमत्तेशी संबंधित कोणत्याही अधिकाराचा हक्कदार राहणार नाही आणि त्यांच्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही दायित्वासाठी जबाबदार राहणार नाही. त्याने असे आरोपदेखील केले आहेत, ज्यात त्याने म्हटले आहे की, २००५ ते २००७ या काळात त्याला जबरदस्तीने औषधं देण्यात आली होती आणि त्यानं एक वर्ष घरात कोंडून ठेवल्याचंदेखील सांगितले आहे.फैजलनं त्याच्या कुटुंबावर त्याची बदनामी केल्याचा आरोपदेखील केला आहे.
फैजल खान हा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. फैजलने त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. फैजलचे फिल्मी करिअरसुद्धा फारसे चांगले नव्हते.फैजलने ‘कयामत से कयामत तक’मध्ये खलनायकाची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने त्याच्या वडिलांच्या ‘तुम मेरे हो’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याचबरोबर फैजलने मदहोश (१९९४) आणि चिनार दास्तान-ए-इश्क (२०१५)सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर तो आमिर खानच्या ‘मेला’ सिनेमातही दिसला होता.