बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्या मुंबईसह देश विदेशात कोट्यावधींची संपत्ती आहे. या मालमत्तेत त्यांचा अंधेरी येथील डुप्लेक्स फ्लॅटचाही समावेश होतो. नुकतंच अमिताभ बच्चन यांचा हा फ्लॅट अभिनेत्री क्रिती सेनॉनने भाड्याने घेतला आहे. क्रितीने २ वर्षांच्या भाडे करारावर हा फ्लॅट घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मनी कंट्रोल’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांचा हा फ्लॅट अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला रोडजवळ आहे. या ठिकाणी असणाऱ्या अटलांटिस बिल्डींगच्या २७ आणि २८ व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. या फ्लॅटसोबत ४ कारसाठी पार्किंगची जागाही उपलब्ध आहे. अमिताभ बच्चन यांनी हा फ्लॅट एप्रिल २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला खरेदी केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिती सेनॉनने केलेला हा भाडे करार १२ नोव्हेंबरला झाला आहे. हा करार ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीसाठी आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटसाठी क्रितीने ६० लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणूनही ठेवले आहेत. या फ्लॅटच्या एका महिन्याचे भाडे तब्बल १० लाख रुपये इतके आहे.

क्रिती सेनॉन ही ‘मीमी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिने एका सरोगेट मदरची भूमिका साकारली होती. ‘मीमी’ हा चित्रपट समृद्धी पोरे यांच्या २०११ सालातील ‘आई व्हायचंय मला’ या राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या चित्रपटाचा रिमेक आहे.

या चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. त्यानंतर आता क्रिती लवकरच ‘बच्चन पांडे’, ‘आदिपुरुष’, ‘भेडिया’ आणि ‘गणपत’ यासारख्या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kriti sanon has rented amitabh bachchan andheri apartment rent security price will shock you nrp