गेल्या वर्षभरापासून करोनाचे संक्रमण कमी होण्याचं नाव घेत नाही. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळे करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. करोनामुळे अनेकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना किंवा कुटुंबाला गमावले आहे. आता अभिनेता राहुल वोहरा याचे करोनाने निधन झाले आहे. थिएटर दिग्दर्शक आणि लेखक अरविंद गौहर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याच्या निधनाची बातमी दिली आहे.

अरविंद गौहर यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत राहुलच्या निधनाची बातमी दिली. “राहुल वोहरा चालला गेला. माझा एक उत्तम अभिनेता. कालचं राहुल म्हणाला होता की “जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो,” काल संध्याकाळी त्यांना राजीव गांधी रुग्णालयातून आयुष्मान, द्वारका येथे हलविण्यात आले होते..पण राहुल आम्ही सर्व तुला वाचवू शकलो नाही, आम्ही माफी मागतो आम्ही तुझे गुन्हेगार आहोत…शेवटचा सलाम”, अशी पोस्ट अरविंद यांनी केली.

राहुलने मृत्युपूर्वी त्याच्या फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने मदत मागितली होती. “जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो,”असं राहुल म्हणाला. त्यापुढे त्याने त्याची संपूर्ण माहिती दिली.

पुढे तो म्हणाला, “मी लवकरच जन्म घेईल आणि चांगले काम करेल. आता माझ्यातील धैर्य संपले आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने केली होती.” राहुलची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. करोनाच्या या लढाईत त्याला हार पत्करावी लागली. अखेर त्याने फेसबूकवर पोस्ट शेअर करत सगळ्यांचा निरोप घेतला.

राहुलची गेल्या काही दिवसात तब्येत अतिशय खालावली होती, त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. पण सातत्याने त्याची स्थिती खालावत होती. राहुल हा मुळचा उत्तराखंडचा होता. राहुल हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फ्रीडम’ या वेबसीरिजमध्ये तो दिसला होता. या वेबसीरिजमधील त्याची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.