अभिनेत्री पत्रलेखा हिच्या वडिलांचं निधन झालं. आज संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबद्दल माहिती दिली आहे. याबद्दल तिने भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. तिचे सहकलाकार, मित्रमंडळी आणि चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे.

अभिनेत्री पत्रलेखा हिने आपल्या वडिलांना शेवटचा निरोपही देता न आल्याची खंत व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “मी चिडले आहे, मी नाराज आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. ही वेदना काळजाला चरे पाडत आहे. तुम्ही काहीही न सांगता आम्हाला सोडून गेलात.”

“आमच्या आठवणींमध्ये आणि आमच्या चांगल्या कामामध्ये तुम्ही कायम असाल असंही ती म्हणते. ती लिहिते, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही कायम तुमचाच एक भाग असू आणि तुम्ही आमच्या माध्यमातून जिवंत असाल. आम्हाला हे सुंदर आयुष्य दिल्याबद्दल आभारी आहे.”
ते एक उत्तम वडील, उत्तम पती असल्याचंही ती सांगते. तसंच त्यांचे मित्रही त्यांचं कौतुक करत असल्याचं, त्यांच्या गुणांना नावाजत असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तिच्या या पोस्टवर तिचे अनेक सहकलाकार, चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर यांनी कमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही आम्ही तुझ्या दुःखात सहभागी असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्री सोनम कपूरनेही या प्रसंगी कमेंट करत दुःख व्यक्त केलं आहे.

डायना पेंटी, साकीब सालेम, आदिती राव हैदरी अशा बऱ्याच कलाकारांनी तिला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

पत्रलेखाने झी५ च्या ‘फॉरबिडन लव्ह’मध्ये काम केलं होतं. ती आणि अभिनेता राजकुमार राव हे लिव्ह इन पार्टनर असून राजकुमार तिच्यासोबतचे फोटो कायम शेअर करत असतो.