Ayushmann Khurrana Properties : बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या ‘थामा’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘विकी जॉनर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा हा अभिनेता गेल्या १३ वर्षांपासून चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत, अभिनेत्याने बरीच संपत्ती जमवली आहे, ज्यामुळे आयुष्मान खुराना आता विविध शहरांमध्ये असंख्य मालमत्तांचे मालक आहे. आयुष्मान खुरानाची मालमत्ता कुठे-कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

आयुष्मान खुराना मुंबईतील विंडसर ग्रँड रेसिडेन्सेस येथे एक आलिशान ७ बीएचके अपार्टमेंटचा मालक आहे. हे ४,०२७ चौरस फूट अपार्टमेंट २० व्या मजल्यावर आहे. तो त्याची पत्नी ताहिरा कश्यप आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराना यांच्याबरोबर या आलिशान घरात राहतो. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, या अपार्टमेंटची किंमत १९ कोटी आहे.

आयुष्मान खुरानाचे मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील इम्पीरियल हाइट्स टॉवर सीएचएस लिमिटेडमध्ये एक अपार्टमेंट आहे. गेल्या वर्षी त्याने हे २,२०० चौरस फूट अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. आयुष्मान खुराना आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराना यांचे पंचकुला येथे एक घर आहे, जिथे ते वारंवार सुट्टी घालवतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या घराची किंमत अंदाजे ९ कोटी आहे. आयुष्मान चंदीगडचा रहिवासी आहे आणि त्याचे तेथे एक घरदेखील आहे, ज्यामध्ये बॅडमिंटन कोर्टदेखील आहे.

आयुष्मान खुरानाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, अभिनेत्याकडे ८० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तो सध्या ‘थामा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसत आहे. रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आयुष्मानचा ‘पती, पत्नी और वो दो’ हा चित्रपटही येणार आहे. या चित्रपटात सारा अली खान, वामिका गब्बी आणि रकुलप्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत.

अभिनयाबरोबरच आयुष्मानने आपल्या डान्स, गाणी आणि लेखनानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचा चाहता वर्गही बऱ्यापैकी मोठा आहे. आयुष्मान वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने एका चॅनेलच्या रिॲलिटी शो ‘पॉपस्टार’ मध्ये सर्वात तरुण स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. आयुष्मानला त्याच्या पहिल्याच सिनेमात अभिनयाबरोबरच गायनाचीही संधी मिळालेली.