बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याचा ‘सरदार का ग्रॅंडसन’ नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दल बोलताना ‘सरदार का ग्रॅंडसन’ हा त्याच्या ह्रदयाजवळचा चित्रपट आहे, असं सांगितलं. कारण हा चित्रपट त्याच्या आजींसाठी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि या चित्रपटासाठी दिग्दर्शक काश्वी नायर यांचे आभार देखील मानले.
अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सध्या तो त्याच्या ‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटासोबत जोडल्या गेलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात अर्जुन कपूरने लिहिलं, “मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, मला नेहमी असेच चित्रपट मिळतात ज्याच्या माध्यमातून मी माझं लहानपण आणि जगण्याचा अनुभव घेऊ शकतो…मग तो ‘की अॅंड का’ असो जो माझ्या आईंसाठी होता, किंवा मग आताचा ‘सरदार का ग्रॅंडसन’ असो जो माझ्या आजींसाठी आहे… हे ते चित्रपट आहेत जे माझ्या आत्म्यासोबत जोडले गेले आहेत आणि माझे आवडते चित्रपट आहेत… ‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटाचा मी खूप आभारी आहे, यानिमित्ताने मला दिग्दर्शक काश्वी नायर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली…माझी पहिली महिला दिग्दर्शक…ज्यांची स्वतःची ही पहिली फिचर फिल्म आहे…काश्वी, तु मला अशा चित्रपटात काम करण्याची संधी दिली, ज्याचा मला गर्व वाटतोय…”, असं लिहून अभिनेता अर्जुन कपूरने दिग्दर्शक काश्वी नायर यांचे आभार देखील मानले आहेत.
या चित्रपटात ‘सरदार’ ही त्याच्या आजींसारखीच मिळती-जुळती असल्याचं देखील अर्जुन कपूर म्हणाला. यापुढे बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, “या चित्रपटात काम करून मला खूप आनंद होतोय…या चित्रपटात काम करताना मला आजींसोबतचे अविस्मरणीय क्षण जगता आले जे मला माझ्या लहानपणी मिळाले नाही..”. यासोबतच त्याने त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट आवर्जून पाहण्याचं आवाहन देखील केलंय.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता हीने ‘सरदार’ची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता अर्जुन कपूर त्यांच्या नातवाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंह, अदिति राव हैदरी, जॉन अब्राहम, कंवलजीत, कुमुध मिश्रा आणि सोनी राजदान यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.