यशराज फिल्मस् निर्मीत ‘धूम’ सिनेमाच्या सर्वच सिक्वलला मोठी लोकप्रियता मिळाली. बॉक्स ऑफिसवरदे खील या सिनेमांची तगडी कमाई झाली. अ‍ॅक्शन, थ्रीलर आणि सस्पेंस असलेल्या या सिनेमाच्या तीनही भागांना चाहत्यांनी मोठी पसंती दिली. ‘धूम’ सिनेमाच्या तीन लोकप्रिय सिक्वलनंतर आता लवकरच ‘धूम-४’ येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. एवढचं नाही तर ‘धूम’ सिनेमाच्या चौथ्या भागात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि  दबंग सलमान खान झळकणार अशा चर्चांना उधाण आलंय.

‘धूम’ सिनेमाच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांची टक्कर पाहायला मिळाली. तर दुसऱ्या भागात हृतिक रोशन अभिषेकसोबत दोन हात करताना दिसला. ‘धूम-३’ मध्ये आमिर खान आणि अभिषेक बच्चनची अ‍ॅक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या सिनेमाच्या  तिनही भागात अभिषेक बच्चन महत्वाच्या भूमिकेत झळकला. मात्र सिनेमाच्या चौथ्या भागात अभिषेकच्या नावाची चर्चा नसून अक्षय आणि सलमानच्या नावांची जोरदार चर्चा सुरुय. या पावर पॅक सिनेमात अक्षय आणि सलमानची अ‍ॅक्शन पाहण्यासाठी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. सोशल मीडियावर ‘धूम-4’ या सिनेमाचं एक पोस्टर देखील व्हायरल होऊ लागलं आहे. 

हे देखील वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे ‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचं स्वप्न राहिलं अपूर्ण

अक्षय कुमार आणि सलमान खान ‘धूम 4’ मध्ये झळकणार ही बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. यावेळी चाहत्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अक्षय पूर्णपणे अ‍ॅक्शनमध्ये मूडमध्ये दिसत आहे. तर काही चाहते या दोघांची अ‍ॅक्शन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र या बद्दल चित्रपटातील अभिनेत्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही सोशल मीडिया यूजर्संनी या अफवा पसरवल्याचं म्हंटलं जातंय.

 गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक रवी तेजा यांच्या ‘खिलाडी’ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान व्यस्त असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. तर अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’  हा सिनेमा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय अक्षय कुमार येत्या काळात ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’ या सिनेमातून झळकणार आहे.