Ayushmann Khurrana Networth : आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आयुष्मान खुराना आज त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. आयुष्मान हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाबरोबरच आयुष्मानने गाणी आणि लेखनानेही चाहत्यांची मने जिंकली.
आयुष्मानने घरी वडिलांच्या कडकपणाचा सामना केला आणि ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैसे कमवले. जेव्हा त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मोठ्या बॅनर कंपन्यांनी त्याला नाकारले.
चंदीगडमधील एका मध्यमवर्गीय मुलाने केवळ ए-लिस्ट स्टारचा दर्जा मिळवला नाही तर त्याने स्वतःची ओळखही निर्माण केली. सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांनी आयुष्मान खुरानाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि आता तो मॅडॉक हॉरर-कॉमेडी विश्वात पाऊल ठेवणार आहे. १०० कोटी क्लबचे अनेक हिट चित्रपट देऊनही आयुष्मानचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते.
‘विकी डोनर’, ‘आर्टिकल १५’, ‘दम लगा के हईशा’, ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’ आणि ‘अॅन ॲक्शन हिरो’सारखे चित्रपट त्याने केले आहेत. याशिवाय तो एक उत्तम गायकदेखील आहे आणि त्याने ‘पानी दा रंग’, ‘सडी गली आजा’, ‘नैना दा क्या कसूर’सारखी गाणी गायली आहेत. पण, त्याच्या प्रवासाची सुरुवात इतकी सोपी नव्हती. आता आयुष्मान खुरानाची एकूण संपत्ती सुमारे ९०-१०० कोटी असण्याचा अंदाज आहे.
कॉलेजच्या काळात आयुष्मान त्याच्या मित्रांबरोबर कधी लग्नात तर कधी ट्रेनमध्ये गाणे गाऊन त्याच्या प्रवासासाठी पैसे कमवत असे. २०१७ मध्ये ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आयुष्मानने हा किस्सा सांगितला होता. आयुष्मानच्या आयुष्यातील आणखी एक आव्हान म्हणजे त्याच्या वडिलांचा कडकपणा. ‘ऑनेस्टली सेइंग’ पॉडकास्टमध्ये त्याने खुलासा केला होता की त्याचे वडील ‘डिक्टेटर’ होते आणि त्याला लहानपणी चप्पल आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती.
आयुष्मान १६ वर्षांचा असताना प्रेमात पडला. त्याने कपिल शर्माच्या शोमध्ये ताहिरा कश्यपबरोबरची त्याची प्रेमकहाणी सांगितली होती. अभिनेत्याने सांगितले की, तो १२वीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान तिला भेटला आणि प्रेमात पडला. त्याने सांगितले की, रोडीज जिंकताच आणि स्टारडम मिळवू लागताच त्याने ताहिराबरोबर ब्रेकअप केले. पण, लवकरच त्याला जाणवले की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि नंतर तो परत आला आणि २००८ मध्ये दोघांनीही लग्न केले. आयुष्मान आता दोन वर्षांनंतर मॅडॉक हॉरर-कॉमेडी विश्वातील पुढील अध्याय ‘थामा’द्वारे बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.