विधू विनोद चोप्रांच्या ’12th Fail’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. विक्रांत मेस्सी व मेधा शंकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ’12th Fail’ २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. फक्त २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६६.५८ कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल लाइफ जोडप्याची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली. नुकताच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आणि चर्चा सुरु झाली खऱ्या आयुष्यातील मनोज शर्मा व श्रद्धा जोशी या प्रेरणादायी जोडप्याची! हे दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे? याबाबत जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशातील मुरैना या लहानशा गावातून मनोज कुमार शर्मा यांचा प्रवास सुरू झाला. बेताची परिस्थिती, गरीब कुटुंब अशा परिस्थिती त्यांनी जिद्दीने अभ्यास केला. परंतु, त्यापूर्वी बारावीची परीक्षा देताना ते नापास झाले होते. एका इमानदार पोलीस अधिकाऱ्याने शाळेत सुरु असणारी कॉपी व्यवस्था बंद पाडल्यामुळे ७० ते ८० टक्के मुलं नापास झाली. त्या अधिकाऱ्याकडे पाहून मनोज शर्मांनी भविष्यात पोलीस अधिकारी व्हायचा निश्चय केला.

मनात ठरवल्याप्रमाणे युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी ते दिल्लीला पोहोचले. इथेच त्यांची ओळख श्रद्धा जोशी यांच्याशी झाली. मुखर्जी नगर येथील यूपीएससी कोचिंग सेंटरमध्ये दोघांची भेट झाली. श्रद्धा यांना हिंदी साहित्यात रस असल्याने या कोचिंग इन्स्टिट्यूटमधील एका शिक्षकाने त्यांना मनोजला भेटण्यास सांगितलं. त्यांच्या पहिल्या भेटीविषयी मनोज शर्मा सांगतात, “मला तिने स्वत:चं नाव सांगितलं. तिच्या नावानेच मी मंत्रमुग्ध झालो होतो. “एक तो नाम श्रद्धा, उपर से उनका शहेर अल्मोरा (एक तर तिचे नाव होते श्रद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती अल्मोरा नावाच्या शहरातून आली होती) त्यादिवशीच मला जाणवलं हिच्यात काहीतरी खास आहे. अखेरीस मी भावना व्यक्त केल्या. पण, सुरुवातीला तिने नकार दिला. मला म्हणाली तू वेडा आहेस का?”

हेही वाचा : सुकन्या मोनेंनी लेकीसाठी घेतला होता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय; म्हणाल्या, “पाळणाघरात किंवा नॅनीच्या जीवावर…”

श्रद्धा जोशींच्या नकारानंतरही मनोज शर्मांनी हार मानली नव्हती. त्यांनी आपण किमान मित्र राहूयात असा प्रस्ताव श्रद्धा यांच्यापुढे ठेवला. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ते चहा बनवायला शिकले. याचं कारण सांगताना मनोज शर्मा म्हणाले, “श्रद्धा पहाडी प्रदेशातील असल्याने तिला चहा प्रचंड आवडायचा. रात्री झोपताना देखील हे लोक चहा पिऊ शकतात याची मला कल्पना होती. म्हणून मी चहा बनवायला शिकलो. तिचं घर तेव्हा कोचिंग क्लासेसपासून फार दूर होतं. त्यामुळे मी तिच्यासाठी दोन पोळ्या, लोणचं आणि मक्क्याचं नमकीन बनवायचो. प्रेम वगैरे होईल पण, सगळ्यात आधी मी तिला एक चांगला माणूस वाटलो पाहिजे अशी माझी इच्छा होती.”

हेही वाचा : लग्नात Lafdi हॅशटॅग का वापरला? गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडुलकरने पहिल्यांदाच सांगितलं कारण; म्हणाले…

मनोज कुमार शर्मा यांनी सुरुवातीच्या दिवसांत वाचनालयात शिपायाचं काम केलं. रात्री वाचनालय बंद करून ते अभ्यास करायचे. या काळात त्यांनी अनेक पुस्तकं वाचली. याविषयी सांगताना मनोज कुमार शर्मा एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हणाले, “दिवसभर अभ्यास करून मी रात्रीच्या वेळी लोकांच्या श्वानांना फिरवायचो. एका श्वानामागे तेव्हा मला ४०० रुपये मिळायचे. हे काम मी श्रद्धाला न सांगता करायचो. पण, एके दिवशी तिने मला पाहिलं. त्यावेळी मी फारच घाबरलो. मला वाटलं ती नाराज होती. पण तिने मला प्रचंड समजून घेतलं. आयुष्यात प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश जरुर मिळतं. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा.”

हेही वाचा : Video: मेहंदी सोहळ्यात आमिर खानच्या जावयाचा ‘या’ मराठी कलाकारांसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

मनोज शर्मा यांच्या दिल्लीतील संपूर्ण प्रवासात त्यांना श्रद्धा जोशींची मोलाची साथ लाभली. त्यांचे मित्रही श्रद्धा यांना घाबरून राहायचे. दिवसभर काय-काय अभ्यास केला याचा संपूर्ण तपशील त्या आवर्जून पाहायच्या. अखेरीस खूप कष्ट करून मनोज शर्मा यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. चौथ्या प्रयत्नात १२१ वा क्रमांक मिळवून ते आयपीएस झाले. IPS मनोज कुमार शर्मा हे सध्या मुंबई पोलिसात अतिरिक्त आयुक्त आहेत आणि आज त्यांची पत्नी श्रद्धा जोशी या IRS आहेत. सुरुवातीला त्यांनी उत्तराखंड सरकारमध्ये काम केलं. सध्या त्या महाराष्ट्र पर्यटन विभागात कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th fail fame couple real life love story ips manoj sharma and irs shraddha joshi sva 00