विक्रांत मेसी आणि मेधा शंकर अभिनीत ’12th फेल’ २०२३ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. फक्त २० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६६.५८ कोटींची कमाई केली. ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ’12th फेल’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट प्रेक्षकांसह अनेक कलाकारांच्या पसंतीस उतरला आणि त्यांनी भरभरून या चित्रपटाचं कौतुक केलं. या चित्रपटात विक्रांत मेसी याने मनोज शर्मा, तर मेधा शंकरने श्रद्धा जोशी यांची भूमिका साकारली होती.

’12th फेल’ चित्रपट २५० भारतीय चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. अशातच चित्रपटात श्रद्धा जोशी यांची भूमिका साकारणाऱ्या मेधा शंकरला आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण आली. तिने सांगितले की एक काळ असा होता जेव्हा तिच्या बँकेच्या खात्यात फक्त २५७ रुपये शिल्लक होते.

हेही वाचा… तब्बल तीस वर्षांनंतर माधुरी दीक्षितने रिक्रिएट केला ‘हम आपके है कौन’चा खास लूक, पाहा व्हिडीओ

अलीकडेच आयएमडीबीला (IMDb) दिलेल्या मुलाखतीत मेधा शंकरने तिच्या संघर्षातील दिवसांची आठवण सांगितली. ती म्हणाली, ’12th फेल’ चित्रपटाचा भाग होण्यासाठी तिला खूप वेळ लागला. मेधाने २०१८ मध्ये मुंबईत अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. २०२२ मध्ये तिने या चित्रपटासाठी कास्टिंग एजन्सीकडे पहिल्यांदा ऑडिशन दिले. नंतर ती दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि त्यांच्या टीमबरोबर स्क्रीन टेस्टसाठी गेली.

ऑडिशनदरम्यान मेधाला हा रोल तिच्यासाठीच आहे अस वाटलं होतं. जेव्हा विधू विनोद चोप्रा यांचा तिला प्रमुख भूमिकेत निवड झाल्याचा फोन आला, तेव्हा तिने आपल्या वडिलांना मिठी मारली. बंगळुरूला असलेल्या आपल्या भावाला तिने फोन केला. तो क्षण तिच्यासाठी खूप भावुक होता आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. संघर्षाचे दिवस आठवून अभिनेत्री म्हणाली, तिने आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानांचा सामना केला. २०२० हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट होते. त्यावेळी समाजात अनेक गोष्टी घडत होत्या आणि तेव्हा तिच्या खात्यात फक्त २५७ रुपये शिल्लक होते.

हेही वाचा… ‘फायटर’, ‘टायगर ३’नंतर यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटावर आखाती देशांमध्ये बंदी

अभिनय क्षेत्रातील प्रवास सांगत मेधा पुढे म्हणाली, ग्लॅमर, ब्यूटी, प्रसिद्धी यासाठी तिला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. या सगळ्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. मेधाला कला आवडत असल्याने तिने अभिनयाचं क्षेत्र निवडलं. अभिनयात मेधा रमायची. तिला माहीत होतं की, अभिनय तिच्यासाठी सर्वस्व आहे.

हेही वाचा… स्विगीच्या बेशिस्त वाहनचालकावर अभिनेता रोनित रॉय संतापला; पोस्ट शेअर करत म्हणाला, “तुम्हाला त्यांच्या जिवाची पर्वा…”

दरम्यान, मेधाबद्दल सांगायचं झालं तर मेधा मराठी कुटुंबातली असून ती दिल्ली एनसीआरमधील नोएडा येथे स्थायिक आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती शास्त्रीय गायिका आणि मॉडेलदेखील आहे. मेधाने दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.