अभिनेत्री यामी गौतम बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या ती ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देशांतर्गत आणि परदेशात चांगले यश मिळविले. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही स्तुती केली जात असली तरी आखाती देशांमध्ये मात्र ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
यामी गौतम अभिनीत ‘आर्टिकल ३७०’ शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. पण, आता या चित्रपटावर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, या बंदीबाबत प्रमाणन मंडळाने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का देणारी ही बाब आहे. कारण- या क्षेत्रातील प्रेक्षक अशा भारतीय चित्रपटांपासून वंचित राहत आहेत.
‘आर्टिकल ३७०’ प्रामुख्याने एका जटिल सामाजिक-राजकीय चौकटीत फिरणारा चित्रपट आहे. २०१६ च्या काश्मीर अशांततेनंतर, रक्तपात न करता ३७० कलम रद्द करून दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी झूनी हक्सर या गुप्तचर अधिकाऱ्याची निवड केली जाते. या गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका यामी गौतमने या चित्रपटात केली आहे.
केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आणि जम्मू, काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचे विभाजन केले.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूमध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना कलम ३७० चित्रपटाचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले, “मी ऐकले आहे की, कलम ३७० वर एक चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. कारण- या चित्रपटामार्फत लोकांना योग्य ती माहिती मिळण्यास मदत होईल.”
पंतप्रधान मोदींच्या भाषणाला उत्तर देत, यामी गौतमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल बोलताना पाहणे हा एक प्रकारचा सन्मान आहे. मला आणि माझ्या टीमला आशा आहे की ही अविश्वसनीय कथा पडद्यावर आणून आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू.”
हेही वाचा… समांथा रुथ प्रभूचा मलेशियामधील बिकिनी लूक व्हायरल; चाहते म्हणाले, “नागा चैतन्य…”
दरम्यान, ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटात यामी गौतमसह प्रियमणी, अरुण गोविल व किरण करमरकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाआधी हृतिक रोशन व दीपिका पादुकोण यांचा एरियल ॲक्शन ‘फायटर’ चित्रपट यूएई वगळता सर्व आखाती देशांमध्ये प्रदर्शित करण्यास नकार देण्यात आला होता.