अभिनेता शाहरुख खान हा बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. गेली अनेक वर्षं तो विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. आता त्याच्या चाहतीचा शाहरुखबरोबरचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी त्याचे चाहते अक्षरशः वेडे असतात. शाहरुख खानही कधी त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही. तर आता नुकताच तो दुबईला एका कार्यक्रमासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी गर्दी केली. तेव्हा एका चाहतीने चक्क त्याच्या जवळ जात त्याला किस केलं.
शाहरुख खानचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान एका कार्यक्रमात एंट्री करताना दिसत आहे. तो तिथे येताच त्याच्या भोवती चाहत्यांची गर्दी जमली. एकाने त्याला मिठी मारली, दुसऱ्याने त्याला वाकून नमस्कार केला, अनेक जणांनी त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. इतक्यात एक महिला तिथे आली आणि तिने शाहरुख खानला जवळ घेऊन त्याच्या गालावर किस केलं. ही महिला किस करेल याचा शाहरुख खानला अजिबात अंदाज नसल्यामुळे शाहरुखही अवघडला.
त्यांचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. त्या महिलेने केलेली कृती पाहून शाहरुख खानचे चाहते नाराज झाले आहेत. या व्हिडीओवर एकाने कमेंट करत लिहिलं, “या महिलेला तुरुंगात टाकलं पाहिजे.” तर दुसरा म्हणाला, “जर शाहरुख खानच्या जागी एखादी अभिनेत्री असती आणि एका चंहत्याने तिला असं किस केलं असतं तर तुम्ही शांत बसला असतात का?” तर आणखी एकाने लिहिलं, “हे कौतुकास्पद अजिबात नाही. त्या महिलेने शाहरुख खानला किस करण्याच्या आधी त्याची परवानगी घेतली होती का? नाही.” त्यामुळे नेटकरी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.